कोल्हापूर-इचलकरंजी मनपा सत्तेसाठी युती-आघाडी नेत्यांचा लागणार कसPudhari File Photo
Published on
:
30 Nov 2024, 12:11 am
Updated on
:
30 Nov 2024, 12:11 am
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात नागरीकरणाचा वेग वाढला असून कोल्हापूरनंतर इचलकरंजी ही दुसरी महापालिका अस्तित्वात आली आहे. आता या महापालिकेवर वर्चस्वासाठी महायुतीच्या नव्या आमदारांचा कस लागणार आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजीला महायुतीचेच आमदार निवडून आले आहेत. भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना सज्जतेचे आदेश दिले आहेत; तर पक्षाचा विस्तार करण्यावर आपला भर राहील, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. शिंदे शिवसेनेने राज्यात 57 जागा जिंकल्या असून त्यांचाही विस्तारावर भर राहणार आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीमध्ये सत्तेसाठी चुरस असेल.
राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येण्यापूर्वी कोल्हापुरात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना अशी महाविकास आघाडी सत्तेवर होती. विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात 2019 व 2022 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळविला होता; तर लोकसभेला शिवसेनेला विजय मिळाला होता. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला व विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून शिंदे शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांना यश मिळाले आहे; तर कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचे अमल महाडिक विधानसभेवर निवडून आले आहेत. कोल्हापूर महापालिकेत उत्तरमधील 45 तर कोल्हापूर दक्षिणमधील 36 असे एकूण 81 प्रभाग आहेत.
इचलकरंजी नगरपालिका 2021 मध्ये विसर्जित झाली. तेथे भाजपचे 14 तसेच भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी नगराध्यक्षा राहिल्या. 2016 साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सुरेश हाळवणकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप 14, प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस 18 व एक स्वीकृत सदस्य, अशोकराव जांभळे यांच्या नेतृत्वाखालील 7 व एक स्वीकृत, सागर चाळके यांची ताराराणी आघाडी 11, मदन कारंडे यांची राजर्षी शाहू आघाडी 10 व एक स्वीकृत सदस्य अपक्ष 1 व शिवसेना 1 असे पक्षीय बलाबल होते. 2019 मध्ये प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस सोडली. आता नगरपालिकेत प्रशासकीय कारकीर्द आहे.
या सगळ्या बदलत्या राजकीय परिस्थितीत कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. कोल्हापूरला काँग्रेसचे शाहू महाराज तर इचलकरंजीला शिंदे शिवसेनेचे धैर्यशील माने खासदार आहेत. कोल्हापूर उत्तरला राजेश क्षीरसागर हे शिंदे शिवसेनेचे, कोल्हापूर दक्षिणला अमल महाडिक हे भाजपचे व इचलकरंजीला राहुल आवाडे हे भाजपचे आमदार आहेत. इचलकरंजीला पूर्वी भाजपची सत्ता होती. तेथे आता महायुतीची बेरीज झाली आहे. तर कोल्हापुरातही महायुतीची बेरीज झाली आहे. शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यामुळे महायुतीही भक्कम झाली आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीची सारी मदार सतेज पाटील, व्ही. बी. पाटील, संजय पवार यांच्यासह स्थानिक नेत्यांवर असेल तर इचलकरंजीत काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर सगळी जबाबदारी असेल.
इचलकरंजी मनपाची पहिलीच निवडणूक
एकेकाळी केवळ काँग्रेसचा बालेकिल्लाच नव्हे तर काँग्रेसची अर्थवाहिनी असलेल्या काँग्रेसला इचलकरंजीत अस्तित्व शोधण्याची वेळ आली आहे. इचलकरंजी नगरपालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. विसर्जित नगरपालिकेत भाजपचे प्राबल्य राहिले. इचलकरंजी नगरपालिकेची महापालिका झाल्यानंतर आता होणार्या पहिल्याच निवडणुकीत महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी चुरस असेल.
कोल्हापूर महापालिकेची मुदत नोव्हेंबर 2020 मध्ये संपली तेव्हापासून तेथे प्रशासकीय कारकीर्द सुरू आहेत. या विसर्जित सभागृहात काँग्रेसचे 30, राष्ट्रवादी काँग्रेसचे 14, महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीचे 19, भाजपचे 14 व शिवसेनेचे 4 नगरसेवक होते.