कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीत शिवसेना मोठा भाऊ

1 hour ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

17 Oct 2024, 11:40 pm

Updated on

17 Oct 2024, 11:40 pm

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेसाठी महायुतीमध्ये शिवसेना मोठा भाऊ ठरण्याची चिन्हे आहेत. जागा वाटपात दहापैकी तब्बल चार जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला प्रत्येकी दोन जागा जातील. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीअंतर्गत शिवसेना वरचढ ठरणार असून त्यांच्यावर प्रामुख्याने युतीची भिस्त राहणार आहे. दरम्यान, हातकणंगले मतदारसंघावरही शिवसेनेने दावा केला असून ती जागा मिळाल्यास शिवसेनेला दहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे.

विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. परिणामी, सत्तेचे शिखर गाठण्यासाठी एकेक विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी ज्या पक्षाचा आमदार तो मतदारसंघ त्या पक्षाला, असा फॉर्म्युला दोन्ही बाजूने स्वीकारण्यात आला आहे. त्यानंतर निवडूण येणारा तुल्यबळ उमेदवार असलेला मतदारसंघ त्या पक्षाला सोडण्यात येणार आहे.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे गेले साडेचार वर्षे तयारी करत आहेत. त्यामुळे शिवसेनेतून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल. करवीरमध्ये माजी आमदार चंद्रदीप नरके शिवसेनेचे उमेदवार असतील. राधानगरीतून आमदार प्रकाश आबिटकर पुन्हा मैदानात उतरतील. शिरोळमधून आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिवसेनेच्या चिन्हावर किंवा अपक्ष म्हणून लढतील. ते अपक्ष लढणार असतील, तर त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी मिळेल. दरम्यान, यड्रावकर यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार अमल महाडिक हे भाजपकडून रणांगणात उतरणार आहेत. इचलकरंजीतून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल. कागलमधून राष्ट्रवादी अजित पवार गटातून मंत्री हसन मुश्रीफ, तर चंदगडमधून आमदार राजेश पाटील रिंगणात असतील. जनसुराज्य शक्ती पक्षही महायुतीमध्ये असल्याने शाहूवाडी-पन्हाळा आणि हातकणंगले मतदारसंघ त्यांच्यासाठी भाजपने सोडला आहे. शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातून आमदार विनय कोरे, तर हातकणंगलेमधून दलितमित्र अशोकराव माने यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, हातकणंगलेची जागा शिवसेनेकडे गेल्यास माने यांना धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल.

इतर जागा खेचून आणण्याचे महायुतीसमोर आव्हान

सद्यस्थितीत जिल्ह्यात महायुतीचे चार आमदार आहेत. तर दोन अपक्षांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. कागल, चंदगड, राधानगरी, शाहूवाडी-पन्हाळा हे मतदारसंघ महायुतीकडे आहेत. तर शिरोळ आणि इचलकरंजीतून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आमदारांनी अनुक्रमे शिवसेना व भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या कोट्यातून त्यांना जागा सोडण्यात येणार आहेत. या जागा राखण्याबरोबरच इतर जागा खेचून घेण्याचे आव्हान महायुतीसमोर असेल.

अशा जागा मिळण्याची शक्यता (कंसात उमेदवार)

शिवसेना : कोल्हापूर उत्तर (राजेश क्षीरसागर), करवीर (चंद्रदीप नरके), राधानगरी (प्रकाश आबिटकर), शिरोळ (राजेंद्र पाटील-यड्रावकर)

भाजप : कोल्हापूर दक्षिण (अमल महाडिक), इचलकरंजी (राहुल आवाडे)

राष्ट्रवादी : कागल (हसन मुश्रीफ), चंदगड (राजेश पाटील)

जनसुराज्य : शाहूवाडी-पन्हाळा (विनय कोरे), हातकणंगले (अशोकराव माने)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article