Published on
:
07 Feb 2025, 1:30 am
Updated on
:
07 Feb 2025, 1:30 am
कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे गुरुवारी दुसर्या दिवशीही अन्न विषबाधेच्या 155 बाधित रुग्णांची वाढ झाली असून एकूण बाधितांचा आकडा 755 वर गेला आहे. विशेषतः कर्नाटकच्या सीमेलगत असलेल्या मानकापूर आणि शिरदवाड या गावांमधूनही रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, 20 जणांना अस्वस्थ वाटू लागल्याने इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात हलवले आहे तर तीन लहान मुलांसह सहा ग्रामस्थांना अतिदक्षता विभागात ठेवले आहे.
शिवनाकवाडी परिसरातील अन्न विषबाधेचे रुग्ण आजूबाजूच्या गावांतही सापडू लागल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्न विषबाधेची नेमकी कारणे शोधण्यासाठी प्रशासनाने तपासणी सुरू केली असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि खासदार धैर्यशील माने यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी ग्रामस्थांना घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले. तसेच, कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवल्यास त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
आरोग्य यंत्रणा अॅक्शन मोडवर असून प्रकृती गंभीर होणार्या रुग्णांना तत्काळ आयजीएम रुग्णालयात स्थलांतर करण्यासाठी जिल्ह्यातील 12 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. बाधित गावांमध्ये घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. शिरदवाड गावासह ऊसतोड मजुरांच्या तळांवर विशेष आरोग्य तपासणी शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. प्राथमिक लक्षणे दिसणार्या रुग्णांना तातडीने उपचार दिले जात असून काही गंभीर रुग्णांना मोठ्या रुग्णालयांमध्ये हलवले जात आहे.
जिल्हाधिकार्यांनी दिली भेट
जिल्हाधिकारी येडगे यांनी रुग्णांची भेट घेऊन माहिती घेतली. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करत आहेत. लवकरच विषबाधेचे मूळ कारण स्पष्ट होईल आणि योग्य त्या उपाययोजना राबवल्या जातील, असे सांगून येडगे यांनी जिल्ह्यातील यात्रा, जत्रा व इतर सामुदायिक सोहळ्याच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यासाठी सूचनापत्रक काढणार असल्याचे सांगितले.खा. माने यांनीही रुग्णांची भेट घेऊन प्रशासन सतर्क असून सर्वतोपरी उपचार करत आहे, घाबरण्याचे कोणतेही कारण नसून आरोग्य विभागाकडून मिळणार्या सूचनांचे रुग्ण व ग्रामस्थांनी पालन करावे. आयजीएम रुग्णालयात रुग्णांना तत्काळ सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आणखी बेड वाढवण्याबाबत रुग्णालय अधीक्षकांशी बैठक झाली आहे.