कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना केली. ‘जिल्हा नियोजन’च्या प्रारूप आराखड्याचे पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत 518.56 कोटींचा आराखडा सादर करत 421 कोटींची अतिरिक्त मागणी करण्यात आली. यावेळी जिल्ह्याला भरीव निधी देऊ, अशी ग्वाही पवार यांनी दिली. या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते.
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखडा आणि जोतिबा प्राधिकरणाला निधी द्यावा, अशी मागणी या बैठकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. ते म्हणाले, करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या भाविक, पर्यटकांना आवश्यक सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेला आराखडा मंजूर व्हावा. याकरिता उच्चाधिकार समितीची बैठक घेऊन त्याला निधी उपलब्ध करून द्यावा. जिल्ह्यात पर्यटनाच्या द़ृष्टीने अनेक चांगली कामे झाली आहेत. जिल्हा हा पर्यटन विकासासाठी मोठी संधी असणारा आहे, त्यामुळे पर्यटन विकासासाठी निधी द्या. शिक्षण आणि आरोग्यासाठीही जादा निधी द्यावा.
पालकमंत्री आबिटकर यांच्यासह महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी महापालिकेच्या नव्या इमारतीसाठी निधीची मागणी केली. त्यावर पवार म्हणाले, तुम्ही हद्दवाढच करत नाही, तर पैसे कशाला पाहिजे? कशाला नवी इमारत हवी? हद्दवाढ झाल्याखेरीज कोल्हापूर शहराचा विकास तरी कसा होणार, यामुळे हद्दवाढीसाठी आग्रह धरा. कोल्हापूर शहराची हद्दवाढीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा. शहराच्या हद्दवाढीचा निर्णय घ्या, लागेल तितका निधी देतो, असेही त्यांनी सांगितले. महापालिका नवीन इमारतीसाठी चांगला आराखडा बनवण्यासाठी स्पर्धा आयेजित करा. चांगला परिपूर्ण आराखडा लवकरात लवकर सादर करा, असे ही त्यांनी सांगितले.
केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण लवकर पूर्ण करा. मधाचे गाव पाटगाव अंतर्गत चांगल्या प्रतीच्या शुद्ध मधाचे उत्पादन होत असून, उत्पादन वाढवून रोजगार निर्मितीला चालना द्या, अशा सूचना देत अपारंपरिक ऊर्जा विकास योजनेमधून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यालयांना सोलरवर टप्प्याटप्प्याने रूपांतरित करणे, योग्य पद्धतीने सौर पॅनेल्स इमारतीवर बसवण्याची व्यवस्था करणे याबाबत प्रथम जिल्हास्तर नंतर तालुकास्तरावर कार्यवाही करा, असेही पवार यांनी सांगितले. गंगावेस तालीम विकासाबाबत चर्चा पवार यांनी केली. रंकाळा तलावात जलपर्णी होणार नाही, याकरिता कार्यवाही करा, मेन राजाराम हायस्कूलचा सविस्तर आराखडा सादर करा, कन्व्हेंशन सेंटरला मंजुरी दिली आहे. त्याचे काम लवकर पूर्ण करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना सीसीटीव्ही बसवल्याबद्दल पवार यांनी अधिकार्यांचे अभिनंदन केले.
आमदार राहुल आवाडे यांनी महावितरणकडील कामाबाबत ठोस धोरणात्मक निर्णय व्हावा. इंदिरा गांधी रुग्णालय, इचलकरंजी येथे पदभरती करावी. नावीण्यपूर्ण योजनेंतर्गत ह्युमन मिल्क बँक ही योजना राबववी. माणगाव येथील 197 कोटींचा प्रलंबित प्रस्ताव लवकर मंजूर व्हावा. व्यायामशाळांच्या बांधकाम निधीची मर्यादा 15 लाख करावी, असे सांगितले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादरीकरण केले.