चिपळूण : कोळकेवाडी येथे कोळकेवाडी धरण व्यवस्थापनच्या जागेत ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेसाठी जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यासाठी असे खोदकाम सुरू आहे. pudhari photo
Published on
:
07 Feb 2025, 1:00 am
Updated on
:
07 Feb 2025, 1:00 am
चिपळूण : कोळकेवाडी येथे ग्रॅव्हिटीद्वारे तालुक्यातील 22 गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी खोदकाम करून हा परिसर कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाच्या अंतर्गत येतो. हे खोदकाम थांबवावे, अशी मागणी कोळकेवाडी ग्रा.पं.तर्फे उपसरपंच सचिन मोहिते, माजी सरपंच नीलेश कदम यांनी केली आहे.
कोळकेवाडी गाव भूकंपप्रवण क्षेत्र आहे. तसेच कोयना प्रकल्प बाधीत आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी येथील शेतकर्यांनी आपल्या जमिनी दिल्या. मात्र, आता लोकोपयोगासाठी ग्रामपंचायतीकडे जागाच उपलब्ध नाही. शासकीय योजना राबविण्यास कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाकडे जागेची परवानगी मागावी लागते. अनेकवेळा अंगणवाडी, शाळा, व्यायामशाळा, सहकार सेवा सोसायटी यांच्या इमारती उभारण्यासाठी जागेची मागणी केली असता, कोळकेवाडी धरण व्यवस्थापन त्याला नकार देते. येथून अनेक गावांमध्ये ग्रॅव्हिटीची पाणी योजना मार्गी लागली आहे. प्रत्येकवेळी गावातून खोदकाम केले जाते. मात्र, बाहेरील गावांच्या लोकांना या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी कोळकेवाडी धरण व्यवस्थापन परवानगी देते. या परवानग्या कशा स्वरूपात मिळतात असा सवाल उपसरपंच सचिन मोहिते व माजी सरपंच निलेश कदम यांनी केला आहे.
सध्या अडरे-अनारी ग्रॅव्हिटी पाणी योजनेसाठी कोळकेवाडीमध्ये ठिकठिकाणी खोदाई सुरू आहे. यासाठी मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या वरील बाजूस अनेक वाड्या-वस्त्या आहेत. त्या खालीच खोदाई सुरू आहे.
हा दरडप्रवणग्रस्त व भूकंपप्रवण भाग आहे. अतिवृष्टीत येथील जमिनीला भेगादेखील पडल्या होत्या. यानंतर भूगर्भ शास्त्रज्ञांनी येथे पाहणी केली असता येथील वाड्यांचे पुनर्वसन करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, या लोकांच्या स्थलांतरासाठी जमिनी दिल्या जात नाहीत. त्यामुळे येथील लोक भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी या भागात खोदकाम करण्यास विरोध केला आहे. हे खोदकाम थांबवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाकडे केली आहे.