खेड: येथील जगबुडी नदी किनार्यावरील पालिकेच्या कचरा डम्पिंग ग्राऊंडच्या संरक्षक भिंतीवरून ओसंडून वाहत असलेला कचरा. (छाया : अनुज जोशी)
Published on
:
04 Feb 2025, 12:35 am
Updated on
:
04 Feb 2025, 12:35 am
खेड ः लाखो रुपये खर्चून पालिकेने सुरू केलेल्या जगबुडी नदी किनार्यावरील कचरा डेपो सध्या ओव्हर फ्लो होताना दिसत आहे. या डेपोच्या परिसरातच तीन स्मशानभूमी असून, कचरा डेपो मधील कचरा आता भटकी कुत्री व जनावरे स्मशान भूमीत पसरवत असल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे. याबाबत पालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे.
खेड शहरातील जगबुडी नदी किनार्यावर पालिकेची, वाणी समाज व गुजर समाजाची स्मशानभूमी आहे. हिंदू धर्मामध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृतदेहावर केला जाणारा अग्नी संस्कार हा एक पवित्र विधी मानला जातो. त्यामुळे स्मशानभूमी म्हणजे हिंदू धर्मियांसाठी असलेले पवित्र वैकुंठ धाम असते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून खेड जगबुडी नदी किनारी या विविध समाजांच्या ज्या स्मशानभूमी आहेत त्यांच्या परिसरातच कचरा डम्पिंग ग्राउंड उभारून खेड पलिकेमार्फत शहरातील सर्व कचरा जमा केला जात आहे. स्मशानभूमीचे पावित्र्य त्यामुळे धोक्यात आले आहे.
हिंदू व्यक्तीच्या मृत्यूनंतर हिंदू धार्मिक अंत्यविधी मध्ये तिसर्या दिवशी काही धार्मिक विधी हे स्मशानात केले जातात. मात्र, खेड पालिकेसह जगबुडी नदी किनार्यावरील सर्वच स्मशान भूमीत सध्या दुर्गंधी पसरली असल्याने हे विधी करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कचरा डेपो मध्ये कचरा विलग न करताच ढीग साचत असून हा प्रकार तातडीने थांबवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.