Published on
:
18 Jan 2025, 12:41 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:41 am
घेरडी : घेरडी परिसरातील अनेक गावाला अवैध धंद्यांचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे यातून गुन्हेगारी वाढत आहे. अवैध धंद्येवाल्यांची चांगली चलती असल्याचे दिसून येत आहे. याकडे मात्र पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा घेरडी परिसरात सुरू आहे.
घेरडी परिसरातील वाणीचिंचाळे, वाकी (घे), आलेगाव, पारे, मेडशिंगी, हंगीरगे, डिसकळ या गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चांगले तेजीत सुरू आहेत. या परिसरात बेकायदा दारूची विक्री राजरोसपणे सुरू आहे. खुलेआम मटका, जुगार जोमात सुरू आहे. जर या धंद्यांविरुद्ध कुण्या सर्वसामान्य माणसाने आवाज उठवलाच तर, आमचा धंदा कोणी बंद करू शकत नाही, असा दमच अवैध धंदेवाले देतात. त्यामुळे घेरडी परिसरातील आणि ग्रामीण भागात अवैध धंदे जोमात सुरू आहेत. येथील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची धुरा पोलिसांची आहे. मात्र सध्या या भागात अवैध व्यवसायांचा विळखा पडला आहे. घेरडी पोलिस बिटच्या कार्यक्षेत्रात अनेक समाजसेवी संघटनांनी अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी निवेदने, तक्रार अर्ज देतात. परंतु चार दिवस धंदे आदळ आपटीने बंद करून नौटंकी केली जाते. परंतु चार दिवसानंतर चित्र जैसे थे होताना दिसून येत आहे.
गुन्हे अन्वेषण विभाग अवैध धंदे बंद करण्याचे धाडस दाखवतील काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. या अवैध धंद्यांकडे जिल्हा पोलिस अधीक्षक याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. घेरडी परिसरात कल्याण -मुंबई मटका, जुगार अड्डे, अवैध दारू विक्री चालू आहे. या अवैध धंद्यांमुळे तरुण युवक वाममार्गाला लागत आहेत. तसेच पोलिस विभागाची प्रतिमा मलिन होताना दिसत आहे.