Published on
:
07 Feb 2025, 12:35 am
Updated on
:
07 Feb 2025, 12:35 am
सोलापूर : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला; पण पॅरोल रजेवर घरी आलेला आणि फरार झालेल्या आरोपीला सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांसह अटक केली. त्यांच्याकडून चार पिस्टल व 24 जिवंत काडतुसे जप्त केली. फाईक मुस्ताक कळमबेकर (रा. शिवाजीनगर, मिस्त्री वाला, मिल्लत नगर, रत्नागिरी), निगोंडा हनुमंत बिराजदार आणि राजकुमार हनुमंत बिराजदार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
यात अधिक माहिती अशी की, सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, पोलिस उपनिरीक्षक रविराज कांबळे व त्यांचे पथक जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणार्या इसमाच्या मागावर होते. त्यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रकाश कारटकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. यावरून जंगलगी गावातील राजकुमार बिराजदार यांच्या शेतात जाऊन त्यांनी ही
कारवाई केली. यातील फाईक कळमबेकर यास रत्नागिरी जिल्ह्यातील खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तरीही तो सदरची शिक्षाही कळंबा जेल कोल्हापूर येथे भोगत असताना तिथून पॅरोल रजेवरून येऊन परत कारागृहात हजर झाला नव्हता. पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागू नये म्हणून तो रत्नागिरी येथून पसार होऊन राजकुमार बिराजदार यांच्या शेतात राहत होता. त्याच्याकडे मिळून आलेले पिस्टल हे निगोंडा बिराजदार यांच्याकडून घेतले होते. निगोंडा बिराजदार यांचा अधिक तपास केला असता त्याचा भाऊ राजकुमार बिराजदार यांच्या घरात तीन बनावटी पिस्टल, 18 जिवंत काडतुसे ठेवल्याची माहिती मिळाली. त्यावरून निगोंडा बिराजदार व राजकुमार बिराजदार यांच्या घराची झडती घेतली असता आणखीन तीन बनावटी पिस्टल व 18 जिवंत काडतुसे मिळून आली. एकूण चार पिस्टल व 21 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तपासामध्ये हे पिस्टल विक्रीच्या उद्देशाने बाळगले असल्याचे निष्पन्न झाले आहे.