Published on
:
06 Feb 2025, 12:40 am
Updated on
:
06 Feb 2025, 12:40 am
सर्वसाधारण माणसाला नोकरी लागल्यानंतर त्याचे पहिले स्वप्न असते ते म्हणजे दोनचाकी गाडी घेण्याचे. थोडे आणखी पैसे आले तर तो चारचाकी गाडी घेतो. सध्या कोणकोणत्या घरामध्ये चारचाकी गाड्या आहेत याचा शोध घेण्यासाठी अंगणवाडी सेविका महाराष्ट्रभर घरोघर फिरत आहेत. याचे कारण म्हणजे ‘लाडकी बहीण’चे जे निकष आहेत त्याच्यामध्ये घरामध्ये चारचाकी नसली पाहिजे ही एक अट आहे. तुमच्या वडिलांनी, भावाने किंवा तुमच्या घरात कुणाकडे चारचाकी असेल तर तुम्हाला ‘लाडकी बहीण’ योजनेचे फायदे मिळण्याची शक्यता कमी आहे.
‘लाडकी बहीण’ योजना सुरू झाली तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री यांनी असा धमाका सुरू केला की राज्यभर चैतन्य निर्माण झाले. पंधराशे रुपये दर महिन्याला मिळणार या मोहातून महाराष्ट्रातून लाखो लाडक्या बहिणींनी आपले अर्ज सादर केले. तितक्याच गतीने माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी ते मंजूर करून लाडक्या बहिणींना तत्काळ पंधराशे रुपये महिन्याचा रतीब सुरू केला. लाडक्या बहिणी पण सुखावल्या आणि त्यांनी प्रचंड बहुमताने युतीचे सरकार निवडून दिले. सहाजिकच आहे की फारसे काही न करता दर महिन्याला पंधराशे रुपये येत असतील तर कोणा महिलेला ते आवडणार नाही? महिलांचे घरामध्ये जास्त लक्ष असल्यामुळे चला काही नाही तर भाजीपाला होईल किंवा दुधाचे बिल देता येईल किंवा फार चांगली परिस्थिती असेल तर ब्युटी पार्लरचे बिल भरता येईल. पंधराशे रुपयांची आवक महिलांच्या नावे त्यांच्या खात्यामध्ये सुरू झाली तेव्हा सगळ्या लाडक्या बहिणी सुखावल्या. सरकार निवडून आल्यानंतर मात्र लाडक्या बहिणींमधील वैध कोणत्या आणि अवैध कोणत्या हे ठरणार आहे. या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दीड एक लाख लाडक्या बहिणी यानंतर दोडक्या बहिणी म्हणून ओळखल्या जातील. चारचाकी असूनही अर्ज दाखल केला, सहा किंवा सात हजार रुपये त्यांना अद्यापपर्यंत मिळालेले मानधन शासन काही परत मागणार नाही. भावाने किंवा वडिलांनी हौसेने घेतलेली चारचाकी गाडी मात्र लाडक्या बहिणीच्या मुळावर आली आहे हे निश्चित.
आता आमच्या पुढे असा प्रश्न उभा राहिला की अंगणवाडी सेविका हे सर्वेक्षण करत असताना घरोघर फिरणार आहेत. तेव्हा एखाद्या भावाने घेतलेली चारचाकी गाडी आपल्या दुसर्या कुणा नातेवाईकाचे घरी नेऊन ठेवली तर ही सर्वेक्षण करणाराला दिसणार तरी कशी? तुम्ही घरात आल्यानंतर ‘लाडकी बहीण’ शोधायची की लाडकी चारचाकी गाडी शोधायची हा मोठा प्रश्न अंगणवाडी सेविकांच्या पुढे उभा असणार आहे. आधीच तर माणसे घरामध्ये सापडत नाहीत. गाडी असेल तर त्याचे काही ना काही तरी पुरावे असतात. गॅरेज केलेले असते, गाडी उभी करण्यासाठी जागा केलेली असते. याचा अर्थ लाडक्या बहिणीच्या घरामध्ये चारचाकी गाडी आहे का याचा शोध घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सीबीआय सारखी पद्धत अवलंब लागेल. कुठे चाकांचे ठसे आहेत का? अंगणात गॅरेज किंवा पत्र्याचे शेड केलेले आहे का? याचा शोध घ्यावा लागेल. आता नेमकी कोणी जर गाडी विकून टाकलेली असेल तर त्या लाडक्या बहिणीच्या भावांचे आणि वडिलांचे करायचे काय, असा प्रश्न उभा राहतो.