चिनी अंतराळवीरांनी अंतराळात बनवले रॉकेट इंधन, ऑक्सिजनPudhari File Photo
Published on
:
01 Feb 2025, 12:00 am
Updated on
:
01 Feb 2025, 12:00 am
बीजिंग : चिनी अंतराळवीरांनी अंतराळात कृत्रिम प्रकाश संश्लेषणाच्या नव्या क्रियेने रॉकेटचे इंधन आणि ऑक्सिजन बनवण्यात यश मिळवले आहे. यासाठी त्यांनी पायाभूत उपकरणे आणि किमान ऊर्जेचा वापर केला. चीनला चांद्रभूमीवर स्वतःचा तळ स्थापन करण्याची इच्छा आहे. येत्या दशकभराच्या काळात त्यांची ही मोहीम होईल. त्याद़ृष्टीने हे संशोधन उपयुक्त ठरू शकते. चीनच्या तियानगोंग स्पेस स्टेशनवर हा प्रयोग करण्यात आला.
चीनचे स्वतःचे अंतराळ स्थानक असलेल्या तियानगोंगवर राहणार्या ‘शेनझु-19’मधील क्रुचे सदस्य असलेल्या अंतराळवीरांनी हा नवा प्रयोग केला. ‘तियानगोंग’ या चिनी शब्दाचा अर्थ ‘स्वर्गीय महाल’ असा होतो. चीनचे हे स्वतःचे अंतराळ स्थानक नोव्हेंबर 2022 पासून पृथ्वीच्या खालच्या स्तरातील कक्षेत पूर्णपणे सक्रिय झाले होते. या स्थानकातील अंतराळवीरांनी वनस्पती जशा सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात, तशी करून हे रॉकेट इंधन व ऑक्सीजनही निर्माण केला. कृत्रिम प्रकाश संश्लेषणाचे तंत्र 2015 पासून विकसित होत आहे. त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड व पाण्यापासून ऑक्सिजन व रॉकेट फ्युएल बनवले जातात. त्यासाठी ड्रॉवरसारख्या साध्या उपकरणाचा आणि सेमीकंडक्टर कॅटॅलिस्टचा वापर होतो. नैसर्गिक प्रकाश संश्लेषण क्रियेत जसे ग्लुकोज किंवा शर्करा निर्माण होते, तसे या क्रियेत रॉकेटचे इंधन बनते. चिनी संशोधकांनी यावेळी हायड्रोकार्बन इथिलिन बनवले, जे रॉकेटमध्ये इंधन म्हणून वापरले जाऊ शकते. या क्रियेत वेगळे कॅटॅलिस्ट वापरून अन्य एक इंधन असलेल्या मिथेनचीही निर्मिती केली जाऊ शकते. तसेच फॉर्मिक अॅसिडचा प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापर होऊ शकतो. चिनी संशोधकांनी या प्रक्रियेचा तपशील दिलेला नाही. मात्र, त्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर केलेल्या अशाच प्रयोगाच्या तुलनेत कमी ऊर्जेचा वापर करण्यात आला.