‘मेरी कॉम’, ‘सरबजीत’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे निर्माते संदीप सिंह यांच्या आगामी चित्रपटाविषयी नेटकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यामागचं कारण म्हणजे या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये झळकणारा अभिनेता. ‘द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा पहिला पोस्टर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसून येत आहे. हा दाक्षिणात्य अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टी आहे. ‘कांतारा’ या मूळ कन्नड चित्रपटातून ऋषभने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
या चित्रपटाविषयी उत्सुकता व्यक्त करताना ऋषभ म्हणाला, “द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज या चित्रपटाची संदीप यांची कल्पना इतकी भव्य होती की मी कथा ऐकताच त्याला होकार दिला. त्यासाठी मी क्षणाचाही विलंब केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणं हा माझ्यासाठी शब्दांपलीकडचा सन्मान आहे. ते या राष्ट्राचे नायक आहेत आणि त्यांचा प्रभाव इतिहासाच्याही पलीकडे आहे. त्यामुळे त्यांची कथा पडद्यावर साकारण्याचा मला खूप अभिमान आहे.”
हे सुद्धा वाचा
या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी संदीप सिंह यांची पहिली पसंती ऋषभ शेट्टीलाच होती. मी या भूमिकेसाठी दुसऱ्या कोणत्या कलाकाराचा विचारच केला नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलं. “छत्रपती शिवाजी महाराजांचं सामर्थ्य, चैतन्य आणि शौर्य याला ऋषभ खऱ्या अर्थाने ऋषभ मोठ्या पडद्यावर मूर्त रुप देऊ शकतो. हा चित्रपट माझं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न आहे आणि ही कथा रुपेरी पडद्यावर आणणं हा माझा बहुमान आणि सन्मान आहे. याआधी कधीही न पाहिलेली ॲक्शन कोरिओग्राफी प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून पाहता येईल.”
‘द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’ हा चित्रपट येत्या 21 जानेवारी 2017 रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ऋषभ त्याच्या ‘कांतारा’ या चित्रपटाच्या प्रीक्वेलमध्येही झळकणार आहे. या दोन्ही चित्रपटांशिवाय ‘जय हनुमान’ हादेखील ऋषभचा आगामी चित्रपट आहे.