Published on
:
03 Feb 2025, 11:54 pm
Updated on
:
03 Feb 2025, 11:54 pm
लंडन : ‘जगज्जेता’ असे बिरूद ज्याच्या नावामागे लावले जाते, त्या अलेक्झांडर द ग्रेटचा इसवी सनपूर्व 323 मध्ये मृत्यू झाला. तत्पूर्वी तेरा वर्षे त्याने तत्कालीन जगातील सर्वात मोठे साम्राज्य निर्माण केले होते; मात्र त्याच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. त्याचा नेमका कुठे मृत्यू झाला, कशाने झाला, त्याचा मृतदेह कुठे नेला गेला, याची खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही. सध्याच्या ग्रीसमध्ये एकेकाळी त्याचे मेसेडोनिया हे राज्य होते. तिथे त्याला दफन करण्यात आले, असे काही संशोधक सांगतात, तर काहींच्या मते इजिप्तमध्ये त्याला दफन केले; मात्र आता त्याचा मृतदेह शार्कने खाल्ला, असेही म्हटले जात आहे.
ब्रिटनमधील ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटीतील आर्कियोलॉजी विभागाचे प्राध्यापक निकोलस साँडर्स यांनी सांगितले की, अलेक्झांडरचे थडगे अद्याप सापडलेले नसल्याने त्याचा मृत्यू व अंत्यसंस्कार याबाबत अनेक मतमतांतरे निर्माण झालेली आहेत. साँडर्स यांनी 2006 मध्ये ‘द लाईफ ऑफ अलेक्झांडर द ग्रेट’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत शेकडो लोकांना त्याचे थडगे शोधण्याच्या इच्छेने झपाटले होते; पण त्यांना यश मिळाले नाही. इजिप्तमधील पुरातत्त्व संशोधक व इजिप्तच्या पुरातत्त्व विभागाशी संबंधित खात्याचे माजी मंत्री झही हवास यांनी सांगितले, मी अलेक्झांड्रिया युनिव्हर्सिटीत विद्यार्थी असताना 1963 मध्ये जवळच्या रेल्वे स्थानकानजीक एक ग्रीक संशोधक उत्खनन करीत होता. मी तिथे जाऊन हे कार्य पाहत असे. त्याला या उत्खननातून काहीही सापडले नाही; मात्र तो संशोधनासाठी पाच वर्षे तळ ठोकून होता. सध्याच्या अलेक्झांड्रियामधील रस्त्यांखाली कुठे तरी त्याचे थडगे दडलेले असू शकते, असे अनेकांना वाटते. मूळ अलेक्झांड्रिया शहरावर काळाच्या ओघात नवे शहर वसवले गेले होते. अलेक्झांडरचा इसवी सन पूर्व 10 जूनच्या रात्री किंवा 11 जून 323 च्या सकाळी सध्याच्या इराकमधील बॅबिलॉनमध्ये मृत्यू झाला असावा. त्याच्या मृत्यूचे कारण वादग्रस्त आहे. त्याचा टायफस किंवा मलेरियासारख्या आजाराने किंवा विषारी मद्य पिल्याने मृत्यू झाला असावा, असे म्हटले जाते. काहींना त्याची हत्या झाली असावी, असेही वाटते. केंब्रीज युनिव्हर्सिटीतील ग्रीक संस्कृती विषयाचे प्राध्यापक पॉल कार्टलेज यांनी म्हटले आहे की, अलेक्झांड्रियामधील जो भाग सध्या पाण्याखाली गेला आहे, तिथे कुठे तरी त्याचे थडगे असू शकते. पाण्याखाली गेलेल्या या भागात एकेकाळच्या शाही निवासस्थानांचाही भाग आहे; मात्र जरी आता त्याचे थडगे तिथे सापडले तरी त्याचा मृतदेह सापडणे कठीण आहे. जर त्याचा मृतदेह शवपेटीत सुरक्षितपणे ठेवला गेलेला नसेल, तर असेच घडू शकते. मला तर असे वाटते की, त्याचा देह शार्कनेही खाल्लेला असू शकतो.