चित्रपट वा मालिकांचे शुटींग म्हटले की ते काही सोप्पं काम नाही. प्रत्येकाचे शेड्युल फार त्रासदायी असते. त्यातून सेटवर चीडचीड होण्याचे प्रकार अधूनमधून घडतच असतात. पण ‘जय माँ लक्ष्मी’ टीव्ही शोच्या सेटवरचा वाद बाचाबाचीवरून थेट मारामारीपर्यंत पोहचला.
हाताला दुखापत झालेली असतानाही शूटिंगसाठी आलेल्या अभिनेता शान मिश्राला निर्मात्याने शूटिंग पूर्ण करूनच जाण्याची अट घातली. त्यावर शानने शूटिंग पूर्ण करू शकत नसल्याचे सांगताच निर्माता मंगेश जगताप याने त्याच्यावर हल्ला केला. याबाबत अभिनेता शान मिश्राने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अभिनेता शान आणि निर्माता मंगेश यांच्यात कडाक्याचे भांडण होऊन नंतर शानच्या पाठीवर गंभीर मारहाण करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
शान आणि मंगेश यांच्यातील भांडणाचे रेकॉर्डिंग केले जात होते. ते रेकॉर्डिंग थांबवण्यास शानने नकार दिला. त्यामुळे निर्माता मंगेशचा पारा आणखीन चढला आणि शानला पुन्हा मारहाण करण्यात आली. यावेळी निर्मात्याच्या पत्नीनेदेखील शानवर आरडाओरड केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही घटना टीव्ही शोच्या जगतात चर्चेचा विषय बनली आहे.