Published on
:
08 Feb 2025, 12:45 am
कोल्हापूर ः जिल्ह्यासाठी प्रत्येकी शंभर खाटांच्या महिला व जिल्हा रुग्णालयांना मान्यता मिळाली आहे. मात्र, अकरा वर्षांपासून या दोन रुग्णालयांसाठी शहरात मध्यवर्ती ठिकाणी किंवा परिसरात जागाच उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे मंजुरी मिळूनही रुग्णालयांची उभारणी झालेली नाही. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यातील रुग्णांसाठी आधारवड असणारे छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) हे जिल्हा रुग्णालय सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 2000 मध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित केले. तेव्हापासून येथील जिल्हा रुग्णालयाचे अस्तित्व संपले आहे. कोल्हापूर शहरात जिल्हा रुग्णालय असावे, यासाठी आरोग्य विभागाने शासनाच्या बृहत आराखड्यानुसार 100 खाटांच्या जिल्हा आणि 100 खाटांच्या महिला रुग्णालयास मंजुरी दिली आहे.
दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोल्हापुरात जिल्हा रुग्णालय गरजेचे आहे. तेही मध्यवर्ती ठिकाणी. त्यासाठी सुमारे 2 एकर जागेची गरज आहे. मात्र, ती उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव बारगळला आहे. महिलांच्या आरोग्याच्या गंभीर तक्रारी दिवसागणीक वाढत आहेत. त्यामुळे दर्जेदार सर्वसोयीनींयुक्त महिला रुग्णालय उभा केल्यास ते उपयुक्त ठरणार आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी आपली राजकीय ताकद वापरून जिल्हा रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहेत. शहरात जिल्हा रुग्णालय झाल्यास सीपीआर आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊन रुग्णांवर उपचार करणे अधिक सोयीचे होईल.
सीपीआर पुन्हा हस्तांतरित होणार का?
शेंडा पार्क येथील वैद्यकीयनगरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विस्तार गतीने सुरू आहे. वर्षभरात येथील सर्व विभाग रुग्णसेवेत कार्यान्वित होतील. सर्व वैद्यकीय सेवा एकाच छताखाली रुग्णांना येथे उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग सीपीआर पुन्हा सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करणार काय? हाही प्रश्न आहे.
जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय काळाची गरज
कोल्हापूर जिल्ह्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कर्नाटक राज्यातील रुग्ण उपचारांसाठी सीपीआर येथे येतात. रुग्णांची वाढती संख्या लक्षा घेता, रुग्णालयातील खाटांची संख्या अपुरी पडत आहेत. त्यामुळे शस्त्रक्रियांसाठी काही वेळा वेटिंग ठेवावे लागते. येथील प्रसूती विभाग तर गर्भवती महिलांसाठी देवदूत असून, प्रसूतीसाठी येणारी संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालय काळाजी गरज आहे.