कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर. यावेळी उपस्थित सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. शाहू महाराज, खा. धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे आदी. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
:
03 Feb 2025, 2:06 am
Updated on
:
03 Feb 2025, 2:06 am
कोल्हापूर : जिल्ह्यात गांजाविरोधात तातडीने कडक मोहीम राबवा. गांजा विक्री करणारे, पुरवठा करणारे आणि त्याचे सेवन करणारे या सर्वांना जरब बसेल अशीच कारवाई झाली पाहिजे, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पोलिस प्रशासनाला दिले. रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
इचलकरंजी परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून अधिकार्यांच्याही वारंवार बदल्या होत आहेत. तडीपार झालेले आरोपी राजरोसपणे शहरातून फिरत आहेत. यामुळे शहरातील यंत्रणा अधिक सक्षम करा. इचलकरंजीसाठी स्वतंत्र स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सुरू करा, अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली. वाढत्या गुन्हेगारीमुळे इचलकरंजीच्या विकासाला अडथळा निर्माण होत आहे, असे सांगत पोलिस खाते नेमके करते तरी काय, असा सवालही आवाडे यांनी उपस्थित केला.
शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात गांजा विक्री आणि सेवनाचे प्रकार सुरू आहेत. हा तालुका कर्नाटकच्या सीमेला लागून असल्यामुळे अशा कृत्यांना अधिक वाव मिळत आहे, असे आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले. गोवा राज्यातून होणार्या अवैध दारू वाहतुकीवर नियंत्रण ठेवा, अशी मागणी आ. शिवाजी पाटील यांनी केली. या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री आबिटकर यांनी कडक कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना दिले. ते म्हणाले, जिल्ह्यात अनेक भागात चौकाचौकात गांजा ओढणारे, झिंगत बसलेले तरुण दिसत आहेत. यामुळे सामाजिक प्रश्न निर्माण होत आहे. या सर्वांना जर बसेल असा पोलिस विभागाचा दणका द्या. चौकाचौकात जाऊन कारवाई करा. यासाठी विशेष मोहीम हाती घ्या, असेही त्यांनी सांगितले.
शाळा-महाविद्यालयांतून प्रबोधन करा
गांजा तसेच अमली पदार्थाच्या सेवनाबाबत तरुण पिढी बळी पडत असल्याचे चित्र आहे. यामुळे शाळा-महाविद्यालयांतूनच प्रबोधन करा, आठवी ते दहावी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांशीही संवाद साधा, त्यांच्या पालक बैठका यासारखे उपक्रम राबवा, अशाही सूचना पालकमंत्री आबिटकर यांनी जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाला दिल्या.