मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र अजूनही मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे, आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. यावर आता जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या लढ्याला यश मिळावं, त्यांच्याबद्दल माझ्या मनात सन्मान आहे. त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच त्यांना भेटायला तयार आहे, असं पकंजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान गेल्या वेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते, मात्र बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वातावरण चांगलंच तापलं, धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद देऊ नये अशी मागणी होत होती, धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद मिळालं नाही तर पंकजा मुंडे यांना बीडच पालकमंत्री पद मिळणार का? अशी देखील चर्चा सुरू होती, मात्र अजित पवार हे बीडचे नवे पालकमंत्री झाले आहेत. यावर देखील पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाले तर पंकजा मुंडे यांना जालना जिल्हा देण्यात आला, यावर बोलताना त्या म्हणाल्या की, मला बीड मिळालं असतं तर आनंद झाला असता. मात्र जालना जिल्ह्याचं काम करत असताना माझं जेवढं प्रेम बीड जिल्ह्यावर आहे, तेवढंच प्रेम जालना जिल्ह्यावर देखील असणार आहे. तुमच्या जिल्ह्यानं मला भरपूर प्रेम दिलं. त्यामुळे जिल्ह्यात सर्वांना सोबत घेऊन काम करणार, भेदभाव करणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.