Published on
:
06 Feb 2025, 12:22 am
Updated on
:
06 Feb 2025, 12:22 am
मडुरा : तिलारी कालवा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शेती बागायतीला मोठा फटका बसला आहे. कालव्यातून 26 जानेवारीपर्यंत रोणापाल 44 किमी.पर्यंत पाणी सोडण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन हवेत विरले आहे. येत्या चार दिवसात कालव्यातून रोणापालपर्यंत पाणी न आल्यास शुक्रवार 7 फेब्रुवारी रोजी कालव्यात बसून धरणे आंदोलन करण्याचा इशारा माजी सरपंच सुरेश गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी सुरेश गावडे यांनी तिलारी कालव्याच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. तिलारी कालव्याच्या पाण्याच्या आधारे शेतकर्यांनी माड व पोफळीची बागायती केली आहे. मात्र फेब्रुवारी महिना उजाडला तरीही कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतीसह पोफळी व माड बागायती करपून गेली आहे. पाणी सोडण्याबाबत तिलारी कालवा विभागाकडून केवळ खोटी आश्वासने दिली जात आहेत.
निगुडे येथे कालवा दुरुस्तीची कामे संबंधित ठेकेदारांकडून संथ गतीने सुरू आहेत. खोदाई केलेली माती कालव्यातच टाकण्यात आली आहे. ठेकेदारांवर अधिकार्यांचा कोणताही वचक नसल्याने ठेकेदार मनमानीपणे काम करीत असल्याचे चित्र आहे. कालवा विभागाच्या अधिकार्यांना शेतकर्यांच्या नुकसानीचे कोणतेही सोयरसुतक नाही. तिलारी कालवा विभागाच्या मुख्य उद्देशालाच अधिकार्यानी हरताळ फासला अशी टीका सुरेश गावडे यांनी केली.
पाण्याअभावी शेती बागायतीच्या होणार्या नुकसानीस तिलारी कालवा विभाग पूर्णपणे जबाबदार राहील. पाणी सोडण्याबाबत शेतकर्यांची वारंवार फसवणूक करण्यात येत आहे. येत्या चार दिवसांत तिलारी कालव्यातून पाणी रोणापालपर्यंत न आल्यास शुक्रवार 7 फेब्रुवारी रोजी कालव्यात बसून धरणे आंदोलन करण्याचा इशारा सुरेश गावडे यांनी दिला.