तब्बल 105 दिवसांनंतर रविवारी 19 जानेवारी रोजी ‘बिग बॉस 18’ची सांगता झाली. करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना या दोघांमध्ये अंतिम चुरस रंगली होती. यात प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करणवीर मेहराने बाजी मारली. करणवीरला बिग बॉसची ट्रॉफी आणि त्यासोबतच 50 लाख रुपये बक्षीस मिळालं. या विजयानंतर अनेकांनी करणवीरला शुभेच्छा दिल्या. मात्र काहींनी त्याला ट्रोलसुद्धा केलं. ‘तू बिग बॉस जिंकण्याच्या लायक नाहीस’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली. या टीकाकारांना आता करणवीरने सडेतोड उत्तर दिलं आहे. मंगळवारी रात्री त्याला मुंबईत पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी त्याला ट्रोलिंगबाबत प्रतिक्रिया विचारली.
करणवीर त्याच्या बेधडक स्वभावासाठी ओळखला जातो. त्यामुळे नकारात्मक कमेंट्सचा माझ्यावर काहीच परिणाम होत नसल्याचं त्याने म्हटलं. इतकंच नव्हे तर “जळणाऱ्यांना जळू द्या..” असं म्हणत त्याने काही हातवारे केले. करणवीरचा हा व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘बिग बॉस 18’मध्ये एकूण 23 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी करणवीर मेहरा, विवियन डिसेना, रजत दलाल, अविनाश मिश्रा, चुम दरांग आणि ईशा सिंह हे सहा जण ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले होते. या सहा जणांपैकी ईशा सिंह, चुम दरांग आणि अविनाश मिश्रा हे फिनालेच्या एपिसोडमध्ये कमी मतांमुळे घराबाहेर पडले. त्यानंतर रजत दलाल हा सेकंड रनर अप ठरला, तर विवियन डिसेना हा फर्स्ट रनर अप ठरला.
हे सुद्धा वाचा
करणवीरपेक्षा विवियन डिसेना आणि रजत दलाल हे दोघं विजेता बनण्यासाठी अधिक पात्र होते, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या होत्या. शोच्या पहिल्याच एपिसोडपासून विवियन चाहत्यांमध्ये लोकप्रिय होता. मात्र करणवीरची आक्रमक खेळी प्रेक्षकांना अधिक पसंत पडली. याआधी त्याने ‘खतरों के खिलाडी’ या शोचंही विजेतेपद पटकावलं आहे. आता बिग बॉसनंतर करणने ‘लाफ्टर शेफ’ या शोमध्येही जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
करणवीर मेहराने 2005 मध्ये ‘रिमिक्स’ या शोद्वारे करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘बिवी और मैं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली. त्याने ‘रागिनी एमएमएस 2’, ‘मेरे डॅड की मारूती’, ‘ब्लड मनी’, ‘बदमाशियाँ’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय. ‘फिअर फॅक्टर : खतरों के खिलाडी 14’चा तो विजेता ठरला होता. करणवीरने ‘पवित्र रिश्ता’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘परी हूँ मैं’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘ससुराल सिमर का’, ‘डोली अरमानों की’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.