दोडामार्ग : पंचायत समिती कार्यालयात आ. दीपक केसरकर यांच्याकडे समस्या मांडताना शेतकरी.pudhari photo
Published on
:
06 Feb 2025, 12:40 am
Updated on
:
06 Feb 2025, 12:40 am
दोडामार्ग ः साटेली-भेडशी येथील मायनर कालवा क्रमांक 7 चे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून ठेकेदाराच्या अनास्थेमुळे बंद अवस्थेत आहे. मंजूर कामे ठेकेदार करत नाही आणि याचा परिणाम शेतकर्यांना होत आहे. त्यांना पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे अशा ठेकेदाराला काळया यादीत टाकावे व दुसर्या ठेकेदाराकडून तात्काळ ते काम पूर्ण करून घ्यावे अशी मागणी तेथील स्थानिक शेतकर्यांनी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. यावेळी आ. केसरकर यांनी तिलारी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांना ठेकेदाराकडून काम पूर्ण करून घेण्यासंदर्भात सूचना दिल्या.
आ. दीपक केसरकर हे बुधवारी सायंकाळी दोडामार्ग तालुका दौर्यावर आले होते. यावेळी आ. केसरकर यांनी येथील पंचायत समिती कार्यालयात शेतकर्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक शेतकर्यांनी आपल्या भागातील अनेक समस्यांचा पाढा श्री. केसरकर यांच्यासमोर मांडला. यावेळी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपतालुकाप्रमुख मायकल लोबो, तिलकांचन गवस, बबलू पांगम, विभागप्रमुख रामदास मेस्त्री, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस आदी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या सुरू असलेल्या तसेच अपूर्ण असलेल्या कामावरून आ. केसरकर यांच्याकडे तक्रारी मांडल्या. आयनोडे पुनर्वसन येथील अनेक शेतकर्यांना साटेली भेडशी येथे पर्यायी शेत जमीन मिळाली आहे आणि ती जमीन ओलिताखाली आणण्यासाठी मायनर कालव्याद्वारे पाणी देण्याचे काम मंजूर करून त्यासाठी आवश्यक तो निधीही देण्यात आला आहे. मात्र हे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून बंद अवस्थेत आहे.
शेतकर्यांनी आंदोलनाचा, उपोषणाचा इशारा दिल्यानंतर ठेकेदार ते काम फक्त दोन ते तीन दिवसांसाठी करतो आणि नंतर गायब होतो. हा प्रकार गेल्या चार वर्षांपासून सुरू असल्याचेही उपस्थित शेतकर्यांनी सांगितले. यावेळी आ. केसरकर यांनी या कामाचा ठेकेदार कोण आहे? याबाबत कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी विचारणा करत काम करण्यास ठेकेदार टाळाटाळ का करत आहे असे विचारले असता.
श्री. जाधव म्हणाले की, या कामाचे ठेकेदार अनिरुद्ध पाटील असून त्यांनी अनेक कामे जिल्ह्यात घेतली आहेत. आपण त्यांना वारंवार ही कामे पूर्ण करण्यासंदर्भात पत्र व्यवहार तसेच फोनद्वारे संपर्क केला. मात्र ते सांगितल्यावर तेवढ्यापुरते काम करतात, असे सांगितले.
यावेळी श्री. केसरकर यांनी या प्रश्नासंदर्भात आपण लवकरच बैठक लाऊन संबधित ठेकेदाराला बोलावून घेऊ व काम करण्यास सांगू. अन्यथा त्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करू असे शेतकर्यांना सांगितले.
मजबूत काँक्रीटचे कालवे होणार
घोटगेवाडी कालवा फुटल्याने आम्हा शेतकर्यांचे बरेच नुकसान झाले आहे. पाण्याविना आमच्या शेती, बागायती करपून गेल्या आहेत. पाटबंधारे विभागाने पाण्यासाठी पंपाची व्यवस्था केली आहे. मात्र त्याचा फायदा शेतकर्यांना होत नसल्याचे यावेळी शेतकर्यांनी स्पष्ट केले. यावेळी जाधव यांनी आमच्या विभागामार्फत कर्मचारी नेमून पाणी देण्याची व्यवस्था करतो असे सांगितले. तर कुडासे येथील काही शेतकर्यांनी सांगितले की, कालव्याला गळती लागल्याने आमच्या शेती नापिक होत आहेत. त्यामुळे आमच्या भागातील कालवे हे गोव्याच्या धर्तीवर काँक्रिटीकरण करून बांधण्यात यावे, अशी मागणी आमदार केसरकर यांच्याकडे केली. यावेळी केसरकर यांनी याबाबतची तजवीज करण्यात आली असून पुढच्या वर्षी मजबूत काँक्रिटचे कालवे बांधण्यात येतील असे स्पष्ट केले.