Published on
:
18 Jan 2025, 1:27 am
Updated on
:
18 Jan 2025, 1:27 am
मुंबई : जातीअंताची लढाई कधी आरक्षणाच्या अंदोलनांमध्ये, तर कधी आरक्षणविरोधी सुरांमध्ये पराभूत होत आली आहे. जी कधीच जात नाही ती जात, अशी जातीची व्याख्याच आपण स्वीकारली आणि आता तर शाळेच्या दाखल्यावरील जातीची नोंद हटवण्याची मागणी होत असताना, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने ही जात चक्क परीक्षांच्या प्रवेशपत्रावर म्हणजेच हॉल तिकिटावरही आणली आहे. दहावी-बारावीच्या हॉल तिकिटावर आता जातीचा रकाना चढला आहे.
राज्य मंडळाची बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेची हॉल तिकिटे कनिष्ठ महाविद्यालयांकडून वितरित केली जात असून, त्यावर परीक्षार्थी विद्यार्थ्याच्या चक्क जातीचा उल्लेख पाहून पालकही चक्रावले. ‘कास्ट कॅटगरी’ म्हणून असा वेगळा कॉलम हॉल तिकिटावर यंदा कशासाठी, असा सवालही पालकांनी आपापल्या मुलांच्या कनिष्ठ महाविद्यालयांना केला.
मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले की, यंदा मंडळाने हॉल तिकिटात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. यावर्षी विषयनिहाय न देता तारखेनुसार कोणते पेपर आहेत, त्याची माहिती हॉल तिकिटावर आहे. शाळेत आपल्या मुलांची कोणती जात नोंदवली आहे, याची माहिती पालकांना व्हावी म्हणून दहावी आणि बारावीच्या हॉल तिकिटावर यंदापासून जात प्रवर्गाचा रकाना सुरू केला आहे. शालेय शिक्षण घेऊन विद्यार्थी बाहेर पडला की, हे बदल करता येत नाहीत. कागदपत्रावर जातीची नोंद चुकीची झाली असेल तर पालकांना शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक कार्यालयातून योग्य ती कागदपत्रे सादर करून तो बदल करून घेता येतो. जातीची नोंद कोणती झाली आहे हे पालकांच्या लक्षात यावे, हा एकमेव उद्देश त्यामागे असल्याचेही गोसावी म्हणाले. सामाजिक न्याय विभागाला विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी विद्यार्थ्यांची जातनिहाय आकडेवारी द्यावी लागते त्यासाठीही हॉल तिकिटावरील जात प्रयोगाचा उपयोग होईल, असे ते म्हणाले.
दुरुस्तीचा 200 रुपयांचा भुर्दंड
अनेक हॉल तिकिटांवर जातीचा उल्लेख चुकीचा झाल्याच्याही तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर काही चुका झाल्या असतील, तर त्या शाळांमार्फत दुरुस्त करता येणार आहेत. प्रवर्ग इत्यादी दुरुस्त्या ऑनलाईन पद्धतीने नोंद करता येणार असल्या, तरी त्यासाठी 200 रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागत आहेत.
हॉल तिकीट हे परीक्षेपुरते वापरले जाते. यामुळे असा जातीचा उल्लेख करणे मुळात चुकीचे आहे. ही आवश्यकताच नव्हती. उलट या उल्लेखामुळे नको तो विरोधाभास तयार करण्याचे काम मंडळाने केले आहे.
हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ