Published on
:
07 Feb 2025, 12:48 am
Updated on
:
07 Feb 2025, 12:48 am
पणजी : विकसित भारतासह विकसित गोवा 2047 साठी गोव्याचे डबल इंजिन सरकार अंत्योदय, ग्रामोदय आणि सर्वोदय तत्त्वावर कार्यरत आहे. येत्या 2 महिन्यांत आणखी चार खाणी सुरू होतील आणि त्यातून राज्याला मोठा महसूल मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले.
विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशनात अभिभाषण करताना ते बोलत होते. ते म्हणाले, संविधान स्वीकारून देशाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने ’संविधान का अमृत महोत्सव’ सुरू आहे. विकसित भारत, विकसित गोवा 2047, ची घोषणा करण्यात आली आहे. सरकारने चांगल्या प्रशासनासाठी ‘सुशासन दिवस’ साजरा करत राज्यातील डबल इंजन सरकार साधन सुविधा निर्मितीच्या क्षेत्रात भक्कम काम करत आहे. या कामाचा मूळ तत्व, अंत्योदय, ग्रामोदय आणि सर्वोदय आहे. राज्यात सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शवप्रदर्शन अत्यंत यशस्वीपणे पार पडल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानावे लागतील. सरकार गेल्या पाच वर्षांत उत्कृष्ट कामगिरी करत असून, मागील वर्षाच्या 13.73 विकासदरापेक्षा यंदा 13.87 हा वरचा विकासदर साध्य केला आहे.
ते म्हणाले, 2024-25 या आर्थिक वर्षात विविध योजनांचे 275.9 कोटी रुपये संबंधित लाभार्थींच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. यात कृषी, मासेमारी, समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण खात्यातील योजनांचा समावेश आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकून ठेवण्यात राज्य सरकार यशस्वी ठरले आहे. कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात असून राज्यात घडलेल्या एकूण गुन्ह्यांपैकी 88.38 टक्के गुन्ह्यांचा शोध लावण्यामध्ये पोलिसांना यश आले आहे. रस्ता सुरक्षा बाबतीतही सरकार दक्ष असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या 4 लाख 51 हजार 786 प्रकरणे नोंद केली आहेत. त्यांच्याकडून 29.28 कोटी रुपये दंडाच्या स्वरूपात आकारले असल्याचे ते म्हणाले.
राज्यात केपे, फातोर्डा, मायना कुडतरी, तेरेखोल या ठिकाणी नव्या पोलिस स्थानकांची निर्मिती केली आहे. आरोग्य क्षेत्रातही राज्य सरकारने उत्कृष्ट कामगिरी बजावली असून, केंद्र सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे. प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान, स्वास्थ महिला स्वास्थ गोवा प्रकल्प, केंद्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या विविध योजना राबवण्यात सरकार यशस्वी झाले आहे. 2024-25 सालात राज्यात दिन दयाळ स्वास्थ्य सेवा योजनेची 1 लाख 81 हजार 7 कार्ड वितरित करण्यात आली असून, 8549 जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट उघडण्यामध्ये गोवा आघाडीवर आहे. कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी शेतकर्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. यात शेतकरी आधार निधी योजनेचा समावेश असून अनेक शेती उत्पादनासाठी आधारभूत किंमत देण्यात येत आहे. याबरोबरच आदिवासी, युवक, आणि महिलांच्या विकासासाठी राज्य सरकारकडून विविध योजना यशस्वीपणे राबवल्या जात असल्याचेही ते म्हणाले.
नोकरीचे आमिष दाखवत फसवल्याप्रकरणी 43 संशयितांना अटक, 3 आरोपपत्रे दाखल
जीएसडीपी दरवाढीचे प्रमाण 13.87 टक्के
गेल्या 5 वर्षांत 174.79 कोटींची थेट विदेशी गुंतवणूक रस्ते अपघात भरपाई योजनेचा 50 जणांना लाभ, माझी बस योजनेंतर्गत 37.5 लाखांचे अनुदान
पिंक पोलिस दलाकडून 5387 कॉल्सना प्रतिसाद -33,454 जणांना आयुष्मान कार्डचे वाटप
184 संस्थांना 1.37 कोटींचा स्टार्टअप निधी
791 स्वयंसहाय्य गटांना 36, 47 कोटींचा निधी
1307 शेतकर्यांना कृषी अवजारांसाठी 2.73 कोटींची मदत 3260 शेतकर्यांना 4.40 कोटींची नुकसानभरपाई वितरित