मुंबईतील अंधेरीत २५ वर्षीय पायलट तरुणी सृष्टी तुली हिने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Published on
:
28 Nov 2024, 4:59 am
Updated on
:
28 Nov 2024, 4:59 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील अंधेरीत एका २५ वर्षीय पायलट तरुणीने सोमवारी सकाळी ती राहात असलेल्या फ्लॅटमध्ये जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी मृत तरुणीचा प्रियकर आदित्य पंडित (वय २७) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दिल्लीत अटक करण्यात आली. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, तरुणीच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, संशयित आदित्यने एका कार्यक्रमात मांसाहारी जेवण (नॉन- व्हेज फूड) जेवल्याबद्दल तिचा अपमान केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी सृष्टी तुली एअर इंडियामध्ये पायलट म्हणून काम करत होती. अंधेरी पूर्व येथील मरोळ येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणारी ही तरुणी मूळ उत्तर प्रदेशातील गोरखपूरची आहे. मिळालेल्या माहितीनुसार २५ नोव्हेंबर रोजी ती राहात असलेल्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती.
आदित्य तिचा छळ करत होता. यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले होते. आदित्यने एका कार्यक्रमात मांसाहारी जेवण जेवल्याबद्दल सर्वांसमोर तिचा अपमान केला होता, असे पोलिसांनी सांगितले. यावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आदित्य तिला मध्येच सोडून घरी गेला.
त्यानंतर सृष्टीने त्याला कॉल केला आणि सांगितले की ती जीवन संपवणार आहे. त्यानंतर आदित्य तिच्या घरी आला. पण, जेव्हा तो तिच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला दरवाजा बंद असल्याचे दिसले. तिने आतून काहीच प्रतिसाद दिला नाही. आदित्यने एकाच्या मदतीने कुलूप तोडले असता ती फ्लॅटमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. सृष्टीला रुशैद रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. आदित्यने तिचा छळ केल्याचा आरोप करत तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली.
सृष्टी गोरखपूरची पहिली महिला पायलट
इंडिया टुडे टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सृष्टीचे काका विवेक तुल्ली यांनी सांगितले की ती गोरखपूरची पहिली महिला पायलट होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तिचा याबद्दल गौरवही केला होता. ते पुढे म्हणाले की, सृष्टी सोमवारी पहाटे १२.३० च्या सुमारास तिच्या फ्लॅटवर पोहोचली होती. तिने आदित्यसोबत रात्रीचे जेवण घेतले आणि आईशी फोनवरही बोलली. सृष्टीने आत्महत्या करणार असल्याचे बोलून दाखवल्यानंतर आदित्यने पोलिसांना का कळवले नाही?, असा प्रश्नही विवेक यांनी उपस्थित केला. दरम्यान, गेल्या महिन्यात सृष्टीच्या बँक खात्यातून आदित्यला ६५ हजार रुपये पाठवल्याचेही पोलिसांनी सांगितले.
आदित्यला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सृष्टीचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तिच्या फ्लॅटमध्ये कसलीही चिठ्ठी आढळून आलेली नाही.
मूळचा दिल्लीचा राहणारा २७ वर्षीय संशयित आरोपी आदित्य मागील दोन वर्षांपासून मृत तरुणीच्या संपर्कात होता. तरुणीच्या घरच्यांनी आरोप केला आहे की, तिचा प्रियकर तिची छळ करत होता आणि तिला मारहाणही करत होता. तिच्या मैत्रिणीनेदेखील आरोप केला आहे की, प्रियकर तिला खूप छळायचा. त्यामुळे या सर्व छळांना कंटाळून तिने जीवन संपविल्याचा संशय पोलिसांना आहे.