Published on
:
08 Feb 2025, 1:06 am
Updated on
:
08 Feb 2025, 1:06 am
पणजी : न्यूझीलंडमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून राज्यातील 13 जणांना 36.23 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी गुन्हा शाखेने म्हापसा येथील त्वचारोग तज्ञ डॉ. मिना गोप हिला अटक केली आहे. तर दुसरा संशयित तिचा भाऊ अरविंद गोप याचा शोध सुरु आहे.
गुुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गिरी बार्देश येथील संजना डिचोलकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, संशयित डॉ. मिना गोप आणि तिचा भाऊ अरविंद गोप या दोघांनी तक्रारदाराला न्युझीलंडमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवले. तसेच तक्रारदाराकडून संशयितांनी सप्टेंबर 2020 पासून विविध प्रकारची शुल्क म्हणून 8.5 लाख रुपये घेतले. या संदर्भात संशयितांनी व्हिसा संबंधित बनावट दस्तावेज तयार करून दिले. मात्र अजून तिला विदेशात नोकरी दिली नाही तसेच पैसे परत केले नसल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली. याच दरम्यान वरील संशयितांनी आणखी 12 जणांना तब्बल 27 लाख 73 हजार 540 रुपयांना फसवल्याचेही समोर आले. त्यानुसार, त्या 12 जणांनी गुन्हा शाखेत तक्रार दिली आहे. या दोघांनी न्यूझीलंड मध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून 13 जणांना एकूण 36,23,540 रुपयांना गंडा घातला.या प्रकरणी गुन्हा शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार याच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांनी गुन्हा दाखल केला.