Published on
:
25 Nov 2024, 11:46 pm
Updated on
:
25 Nov 2024, 11:46 pm
सिडनी : एखादा संसर्गजन्य आजार एकापासून दुसर्याला, दुसर्यापासून तिसर्याला असा होत गेला तर यात आश्चर्याचे कोणतेच कारण नव्हते, पण तणाव किंवा उदासीनतासारख्या भावना देखील पक्ष्यांच्या पूर्ण थव्यातील सामाजिक वातावरण बदलून टाकू शकतात, असे सांगितले तर निश्चितच हे आश्चर्य असेल. अलीकडेच झालेल्या एका अभ्यासात ही बाब आढळून आली आहे. या अभ्यासात असे दिसून आले की, थव्यातील अगदी एकही पक्षी उदास असेल तरी काही क्षणात सर्व थवा उदास होऊन जातो. जर्नल प्रोसिडींग्जमध्ये यावर शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे.
या अभ्यासात असेही आढळून आले की, एक पक्षी उदास किंवा तणावग्रस्त असेल तर त्याच्या आसपास राहणारे सर्व पक्षी देखील त्याचप्रमाणे उदास होतात. कोन्सटांज विद्यापीठातील क्लस्टर ऑफ एक्सलन्स कलेक्टिव्ह बिहेवियरचे संशोधक हांजा आणि ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीचे डॅमियन फरिनने या प्रक्रियेवर यावेळी अधिक संशोधन केले आहे. त्यात ही बाब आढळून आली. जलवायू परिवर्तन आणि वेगाने होणार्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या वास्तव्यात सातत्याने बदल होत चालले असून हे देखील यामागील महत्त्वाचे कारण असल्याचे या अभ्यासात नमूद आहे.
संशोधकांनी ऑस्ट्रेलिया व इंडोनेशियासारख्या देशात आढळून येणार्या जेब्रा फिंच नामक 96 पक्ष्यांवर संशोधन करून हा शोध साकारला. या सर्व पक्ष्यांना 4 विभिन्न ठिकाणी ठेवण्यात आले आणि त्यांच्या देहबोलीचा, एकंदर व्यवहाराचा अभ्यास केला. जेब्रा फिंचच्या शेपटीच्या भागात तणावाशी संबंधित हार्मोन अस्तित्वात असतो. संशोधकांनी पक्ष्यातील तणाव मोजण्यासाठी हार्मोन कॉर्टिकोस्टीरोनचा स्तर तपासला. शिवाय, त्यांच्या व्यवहारात कसे बदल होत राहिले, याचीही निरीक्षणे नोंदवली. त्यानंतर हा निष्कर्ष जाहीर केला गेला आहे.