Published on
:
18 Jan 2025, 12:54 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:54 am
बेळगाव : आईने 50 हजारांचे कर्ज घेतले. त्या बदल्यात कर्ज दिलेल्या महिलेने तिच्या मुलाशी माझे जबरदस्तीने लग्न लावले. त्या मुलाने माझ्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले, अशी फिर्याद 17 वर्षीय अल्पवयीन युवतीने टिळकवाडी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये विशाल पुंडलिक ढवळी, रेखा पुंडलिक ढवळी, पुंडलिक ढवळी व श्याम पुंडलिक ढवळी (सर्वजण रा. मंगाईनगर, सहावा क्रॉस, वडगाव) यांच्यासह अन्य आठ जणांचा समावेश आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, 17 वर्षीय युवती कॉलेज विद्यार्थिनी आहे. ती मूळची सौंदत्ती तालुक्यातील आहे. वडील वारल्याने ती, तिची आई, भाऊ व वहिनी सध्या अनगोळ परिसरात राहतात. सदर युवतीच्या आईने संशयितांपैकी रेखा ढवळीकडून 50 हजारांचे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात रेखाने या युवतीच्या आईकडून सोन्याची कर्णफुले गहाण ठेवून घेतली होती.
तथापि, आर्थिक अडचणींमुळे त्या युवतीच्या आईकडून कर्जाची परतफेड होत नव्हती. कर्ज दे, नाहीतर तुझ्या मुलीचा विवाह माझा मुलगा विशाल याच्याशी लावून दे, असा प्रस्ताव रेखाने युवतीच्या आईसमोर ठेवला. सदर युवतीच्या आईने मुलगी कॉलेजला जात असल्याचे सांगत हा प्रस्ताव धुडकावला. त्यामुळे, चिडलेल्या रेखा विशाल ढवळीसह त्याचे कुटुंब व आणखी सात ते आठजण 17 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी युवतीच्या घरी गेले. त्यावेळी युवतीसह तिची आई, काका, भाऊ व वहिनी सर्वजण घरी होतेे. त्या सर्वांना जबरदस्तीने वाहनात घालून मंगाईनगरमध्ये नेले. यावेळी युवतीच्या आईने सध्या पैसे नाहीत, कर्णफुले मोडून घ्या, अशी विनंती केली. तरी त्यांनी सोडले नाही. दुसर्या दिवशी 18 सप्टेंबररोजी सकाळी सहा वाजता मंदिरात नेऊन विशालशी जबरदस्तीने लग्न लावले व घरी घेऊन गेले. त्या दिवशी विशाल ढवळीने माझ्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शिवाय घरी असताना विशालच्या आईने-वडिलानेही आपल्याला त्रास दिल्याचे सदर युवतीने फिर्यादीत नमूद केले आहे. युवतीने 17 जानेवारीरोजी टिळकवाडी पोलिसांत ही फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक परशुराम पुजेरी अधिक तपास करीत आहेत.