Published on
:
08 Feb 2025, 12:30 am
आप सारे फूलों को काट सकते हैं। लेकिन बहार आने से कैसे रोक सकते हैं? असा सवाल विरोधी पक्षनेते असताना शाहबाझ शरीफ यांनी तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांना विचारला होता. इम्रान यांचे राजकीय भवितव्य तेव्हा पणाला लागले होते. सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्यात ते अयशस्वी ठरले आणि पाकिस्तानी लष्कराच्या आशीर्वादाने शाहबाझ हे पंतप्रधान बनले. शाहबाझ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे बंधू आहेत. अगोदर तीनवेळा ते पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री होते. 1999 मध्ये तेव्हाचे लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी लष्करी बंड केल्यानंतर नवाझ यांच्याप्रमाणेच शाहबाझ यांनाही कुटुंबासह मायदेशातून परागंदा होत सौदी अरेबियाचा आश्रय घ्यावा लागला होता. काही वर्षांपूर्वी ‘पनामा पेपर्स’ प्रकरणात नवाझ यांचे नाव आल्यानंतर त्यांनी भ्रष्टाचार करून मनी लाँडरिंगद्वारे विदेशात पैसे ठेवल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांना कोणतेही सरकारी पद भूषवता येणार नाही, असा निर्णय झाल्यानंतर शाहबाझ यांचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर पुढे आले. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेता या पदावर त्यांची निवड झाली. इम्रान खान यांचा संसदेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी पराभव झाल्यानंतर 11 एप्रिल 2022 रोजी शाहबाझ हे पहिल्यांदा पंतप्रधान बनले. त्यावेळी पाकिस्तान हे अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडले होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मदत करून वाचवावे, अशी अपेक्षा शाहबाझ यांनी व्यक्त केली; पण पाकमधील सर्व राजवटी या भ्रष्ट व जनविरोधी होत्या हे माहीत असल्याने आयएमएफने मर्यादित मदत केली आणि अर्थसाह्य देताना रास्त अटीही घातल्या.
अमेरिकेने पाकला एकेकाळी जवळ केले होते, त्यानेही अंतरावरच ठेवले आहे. चीनने पाकच्या डोक्यावरचे कर्ज वाढवून ठेवले असले, तरी पाकच्या अंतर्गत स्थैर्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. गेल्यावर्षी पाकिस्तानात पुन्हा निवडणुका होऊन, शाहबाझ पुन्हा पंतप्रधान झाले; पण त्यांचे सरकार हे अल्पमतातील असून, पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुत्तहिदा कौमी मूव्हमेंट, पाकिस्तान मुस्लिम लीग (क्यू) या व अन्य विविध पक्षांच्या टेकूवर ते उभे आहे. अशावेळी देशाला गर्तेतून बाहेर काढण्याऐवजी शाहबाझ यांनी पाकिस्तानला भारताशी चर्चेद्वारे काश्मीरसह सर्व प्रश्न सोडवायचे आहेत, असे उद्गार काश्मीर एकता दिनानिमित्त मुझफ्फराबाद येथे पीओके किंवा पाकव्याप्त काश्मीर विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करताना काढले आहेत. काश्मिरींना पाठिंबा दर्शवण्यासाठी पाकिस्तानात दरवर्षी हा दिन साजरा केला जातो. वास्तविक पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. त्यामुळे आपण पाकबाबत सांभाळूनच राहायला हवे, अशी भूमिका जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि काँग्रेस नेते मांडत असतात. त्याचा उल्लेख करून केंद्रीय गृहमंत्री शहा म्हणाले होते की, पीओके हा भारताचाच अविभाज्य भाग असून, त्यावर आमचाच अधिकार आहे. 130 कोटींचा आपला हा विशाल आणि महान देश कोणाच्या भीतीने हक्क सोडेल? संपूर्ण काश्मीर हा भारतीय संघराज्यात विलीन झाला आहे.
पीओके आज ना उद्या आम्ही मिळवू, असे केवळ शहांनीच नव्हे, तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही वारंवार म्हटले आहे. स्वातंत्र्यानंतर पाक व अफगाण टोळीवाले काश्मीर खोर्यात घुसले होते, तेव्हा भारतीय जवान त्यांना प्रत्युत्तर देत पिटाळून लावत होते; पण आपले सैन्य जिंकत असताना युद्धबंदी लागू करण्यात आली. तीन दिवसांनंतर युद्धबंधी जाहीर झाली असती, तर पीओके आज भारताचा भाग झाला असता. ज्या पीओकेत शाहबाझ हे भाषण देत होते, तो भाग भारताचाच आहे. तेव्हा काश्मीरबाबत वाटाघाटी करायच्या म्हणजे कोणत्या? ‘पीओके भारताला पुन्हा देऊन टाका’ एवढाच विषय वाटाघाटींचा होऊ शकतो. त्यापेक्षा भारताला लष्करी बळावर तो काबीज करावा लागेल. मुळात पीओकेमधील जनतेचे हक्कही पाकिस्तान सरकार डावलत असते. तेथील जनतेचा असंतोष सतत प्रकट होत असतो, तेव्हा काश्मीरचा विषय उगाच उपस्थित करून नको तेथे चोच घालण्यापेक्षा पाकिस्तानने प्रथम स्वतःच्या घरात काय चालले आहे, ते पाहावे. पाकिस्तानातील जनता गरिबी आणि महागाईमुळे त्रस्त आहे. एवढे असूनही भारतात दहशतवाद पसरवणे सुरूच आहे. बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवादी असलेल्या एका ट्रकचालकाचा लष्कराने खात्मा केला. अधूनमधून गोळीबार, बॉम्बफेक करून भारतविरोधी कारवाया सुरूच आहेत.
काश्मिरींना त्यांचा स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळेपर्यंत पाकिस्तान त्यांना नैतिक व राजनैतिक पाठिंबा देतच राहील, अशी वल्गनाही शाहबाझ यांनी केली आहे. खरे तर, जम्मू-काश्मीरमधील जनतेने लोकसभा व विधानसभा निवडणुकांत निर्भयपणे आणि स्वतंत्रपणे मतदान केले आहे. बंदुकीच्या गोळीची भीती दाखवण्याचे पाकिस्तानचे तंत्र तेथे ‘फेल’ गेले आहे. जम्मू-काश्मीरने ‘स्वयंनिर्णय’ घ्यावा, ही पाकची विकृती आहे. तेथील जनतेला भारतातच राहायचे आहे, तेव्हा भारताच्या अंतर्गत कारभारात पाकने नाक खुपसू नये. तसे ते खुपसले, तर सर्जिकल स्ट्राईक करून पाकचे पेकाट पुन्हा मोडले जाईल. वास्तविक काश्मीर प्रश्न हा आता चर्चेचा विषय राहिलेला नाही. 370वे कलम रद्द झाल्यानंतर तर काश्मीर हा देशाच्या मुख्य प्रवाहात आलेला आहे. पाकिस्तानला हे रुचले नसले, तरी त्याबाबत पाकची पसंती वा नापसंती हा विषयच नाही. वाजपेयींनी लाहोर बसयात्रा केल्यानंतर मैत्री वाढवण्याऐवजी पाकने कारगिलमध्ये घुसखोरी केली. त्यावेळी सणसणीत चोप दिल्यानंतरही पाकला शहाणपण आलेले नाही. आज संपूर्ण जगात भारताची प्रतिमा उंचावली असून, जगात आपली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. पाकची अवस्था आफ्रिका खंडातील एखाद्या चिल्लर देशासारखी झाली आहे. विकसित भारताशी भिकेला लागलेल्या पाकिस्तानची तुलनाच होऊ शकत नाही, तेव्हा पाकने काश्मीरची स्वप्ने पाहणे थांबवून देश म्हणून आपले अस्तित्व राहते का, याची काळजी करावी, हे बरे!