पोलिसांचा तगडा फौजफाटाPudhari News network
Published on
:
19 Nov 2024, 9:30 am
Updated on
:
19 Nov 2024, 9:30 am
विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड पोलिस सज्ज झाले आहेत. बुधवारी (दि. 20) होणारी मतदानप्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी साडेतीन हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच, वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. निवडणूकप्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत पिंपरी, चिंचवड, भोसरी हे तीन मतदारसंघ तर खेड, खडकवासला, मुळशी, मावळ या मतदारसंघाचा काही भाग येतो. सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मतदान केंद्रांच्या सुरक्षेबाबतचा आढावा पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी घेतला आहे.
काही मतदान केंद्रांवर बूथची संख्या जास्त आहे. मतदान केंद्रांवर जाताना मतदारांना अडथळा होऊ नये, तसेच, वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी काही ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल बुधवारी सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे.
तळवडे वाहतूक विभागाअंतर्गत देहूगाव मुख्य कमान ते परंडवाल चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद राहणार आहे. ही वाहतूक कंद पाटील चौकमार्गे तसेच अंतर्गत रस्त्याने इच्छितस्थळी जाईल. सांगवी वाहतूक विभागाअंतर्गत गोविंद गार्डन ब्रीजकडून जी. के. गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलसमोरुन व्हिबगेर चौकात जाण्या येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेशबंदी असून ही वाहने लगतच्या पर्यायी मार्गाने वळवली आहे. भोसरी वाहतूक विभागाअंतर्गत पुणे-नाशिक महामार्गावरील बोर्हाडेवाडी चौक ते मातेरे हाऊस चौक या दरम्यानच्या रोडवर जाणार्या व येणार्या जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ही वाहने
पांजरपोळ चौक किंवा भारतमाता चौकातून तसेच आरटीओ रोडने इच्छित स्थळी जातील. वाहतूक विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वॉर्डन तसेच वाहतूक पोलिस नियुक्त करून केंद्राबाहेर वाहतूक नियमन करण्यात येणार आहे.
साध्या वेशातील पोलिसदेखील ठेवणार ‘वॉच’
पोलिस आयुक्तालय हद्दीतील मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील सुरक्षेचा तसेच मतदानप्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात होत आहे किंवा कसे, याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारी पाहणी करणार आहेत. त्यांच्या सोबत स्ट्रायकिंग फोर्स राहणार आहे. मतदान केंद्र परिसरात गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच, गुन्हे शाखेकडून विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. साध्या वेशातील पोलिसदेखील ‘वॉच’ ठेवणार आहेत. मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान केंद्रामधून मतमोजणी केंद्रापर्यंत मतदान यंत्रे सुरक्षित पोहचणे आवश्यक आहे. त्यासाठीदेखील पोलिसांची विशेष पथके सज्ज करण्यात आली आहेत.