Published on
:
07 Feb 2025, 1:36 am
Updated on
:
07 Feb 2025, 1:36 am
सातारा : जिल्हा पुनर्वसन विभागात अनेक चुकीचे प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहेत. पुनर्वसनाच्या मदतीसाठी बोगस कागदपत्रांचा वापर करणे, मूळ प्रकल्पग्रस्ताच्या आडून बिल्डर, व्यावसायिक अशा बड्यांना जमीन उपलब्ध करणे असे प्रकार करणारी साखळी या विभागात कार्यरत आहे. या विभागाच्या कारभाराची संपूर्ण चौकशी करून 30 एप्रिलपर्यंत दोषी अधिकार्यांवर कारवाई करावी. अन्यथा 1 मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते सुशांत मोरे कयांनी दिला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, प्रकल्पग्रस्तांना करण्यात येणार्या मदततीत भेदभाव केला जातो. मूळ प्रकल्पग्रस्तांना मदत न करता त्यांना वगळले जाते. एजंटाचा वावर प्रचंड वाढला असून अनियमितता आहे. जिल्हा पुनर्वसन विभागाकडे येणार्या प्रकल्पग्रस्तांना दाखले देण्यास टाळाटाळ केली जाते. पुनर्वसन फाईलींमध्येच खासगी टंकलेखक व लिपिक त्यांना ‘माल’ मिळत असल्यामुळे ते फक्त 6 हजार मानधनावर काम करताना दिसत आहेत. संबंधित ठेकेदार खाजगी कर्मचार्यांचे ईपीएफ, ईएसआय तसेच इतर शासकीय महसूल चलनाद्वारे भरतात का? याची सखोल चौकशी करावी. यामध्ये हलगर्जीपणा करणार्यांना काळ्या यादीत टाकावे.
कार्यालयातील तहसीलदार, अव्वल कारकून, लिपिक यांचे 2020 पासूनचे कामकाज तपासले तर काही प्रकरणे उशिरा दाखल होऊनही ती लवकर निकाली निघाल्याचे दिसते. याचा अर्थ काय? अशा प्रकरणांमध्ये कर्मचार्यांचे साटेलोटे आहे का? राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री सातारा जिल्ह्यातील असल्याने त्यांनी या विभागास भेट देऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा. जिल्हा पुनर्वसन विभागाकडून पुनर्वसित गावाला मिळणार्या सुविधा मिळाल्या नाहीत पण ठेकेदारांची बिले निघाल्याची माहिती आहे. या विभागातील अधिकारी तसेच कर्मचार्यांचे कॉल रेकॉर्ड तपासावे तसेच प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा. या विभागातील एजंटगिरीला पायबंद घालावा, अशी मागणीही सुशांत मोरे यांनी केली आहे.
आमचा इतिहास तपासा मगच भूगोलाचा अभ्यास करा
आमचा इतिहास तपासून नंतर आरोप करावेत. कुणीही असो, गैरकारभार आढळल्यास ते प्रकरण शेवटपर्यंत नेऊन धसास लावले आहे. पुनर्वसन विभागात माहिती मागितली असता ब्लॅकमेलिंगसाठी माहिती अधिकार अर्ज येत असल्याचे वक्तव्य केले जाते. या विभागातील अधिकारी, कर्मचार्यांनी पुराव्यानिशी बोलावे. आधी आमचा इतिहास तपासा मगच भूगोलाचा अभ्यास करा, असा इशारा सुशांत मोरे यांनी दिला.