Published on
:
24 Jan 2025, 12:20 am
Updated on
:
24 Jan 2025, 12:20 am
वैभववाडी ः तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गांवरील वैभववाडी शहरानजीक असलेल्या शुक नदीवर पूल पाडत असताना पोकलेन मशीन पुलावरून सुमारे 40 फूट खोल नदीत पडल्यामुळे अपघात झाला. सुदैवाने या अपघातातून पोकल्यान ऑपरेटर अर्जुनकुमार शहा (22 रा. बिहार) हा बालंबाल बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी 4 वा.च्या सुमारास घडली. पुलाची झालेली जीर्ण अवस्था पाहता हा पूल कधीही कोसळून मोठा अपघात घडण्याची शक्यता होती.
तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे. या मार्गांवरी जुने पूल पाडून नवीन पूल बांधण्यात येत आहेत. यागोदर शांती नदीवरील जुना पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरु केले आहे. तर वैभववाडी शहरानजीक असलेल्या शुक नदीवरील जुने पूल पाडण्याचे काम गुरुवारपासून सुरु करण्यात आले आहे. या पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी पोकलेन पुलावर मध्यभागी उभा करून ऑपरेटर पूल पाडण्याचे काम करीत होता. दरम्यान अचानक पुलाच्या मधोमध दोन खांबावर असलेला पुलाचा स्लॅब अचानक कोसळला. या स्लॅबसह सुमारे 40 फूट खोल नदीत ऑपरेटरसह पोकलेन मशीन कोसळले. अपघातात ऑपरेटर बालंबाल बचावला. त्याला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दोन खांबांच्या मधला भाग कोसळला
शुक नदीवरील हा पूल सन 1971-72 साली बांधण्यात आला होता. सुमारे 42. 40 मिटर लांबीचा हा पूल होता. 10. 60 मिटर लांबीचे 4 गाळे होते. यातील बरोबर मधला दोन खांबाच्या मधला भाग कोसळला आहे.