Published on
:
16 Nov 2024, 11:36 pm
Updated on
:
16 Nov 2024, 11:36 pm
लंडन : ऑस्ट्रेलियाजवळ समुद्रतळाशी जगातील सर्वात मोठी प्रवाळरांग ‘ग्रेट बॅरिअर रीफ’ आहे याची आपल्याला कल्पना आहेच, आता संशोधकांनी पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागरात जगातील सर्वात मोठ्या आकाराचे एक प्रवाळ शोधून काढले आहे. त्याची रुंदी तब्बल 34 मीटर असून लांबी 32 मीटर आहे. तसेच त्याची उंची 5.5 मीटर आहे. सोलोमन आयलंडस्च्या थ्री सिस्टर्स आयलंड समूहाजवळ महासागराच्या तळाशी नॅशनल जिओग्राफिक्सच्या प्रिस्टिन सीज टीममधील संशोधकांनी या मोठ्या आकाराच्या प्रवाळाचा शोध घेतला.
ही एकच असलेली प्रवाळरचना सुमारे एक अब्ज पॉलिप्सनी मिळून बनलेली आहे. ‘पॉलिप्स’ हे सूक्ष्म जीव असतात आणि ते 300 ते 500 वर्षे जुने आहेत. संशोधक एनरिक साला यांनी हे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे. हे प्रवाळ चांगल्या स्थितीत आहे; मात्र जागतिक तापमानवाढीचा त्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, असा इशाराही संशोधकांनी दिला आहे. त्यांनी सांगितले, धोक्याची घंटी या मोठ्या प्रवाळाबाबतही वाजलेली आहे. जरी हे प्रवाळ दुर्गम भागात असले तरीही ते सुरक्षित आहे, असे म्हणता येणार नाही. मानवापासून तसेच जागतिक तापमानवाढीपासून असणारा धोका या प्रवाळाला संभवतोच. हे प्रवाळ इतक्या मोठ्या आकाराचे आहे की सुरुवातीला ते पाहिल्यावर संशोधकांना हे बुडालेल्या जहाजाचे अवशेष असावेत, असे वाटले. अंडरवॉटर सिनेमॅटोग्राफर मनू सॅन फेलिक्स यांनी 12 मीटरपेक्षा अधिक डाईव्ह करून या प्रवाळाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि ही रचना म्हणजे एक स्वतंत्र प्रवाळ असल्याचे शोधले. ते ‘पावोना क्लेवस’ प्रजातीचे आहे. हे प्रवाळ अनेक सागरी प्रजातींचा नैसर्गिक अधिवास, आश्रयस्थान आणि प्रजनन स्थळ असल्याचे नंतरच्या अभ्यासातून स्पष्ट झाले.