15 वर्षांनंतर वाढ झालेल्या पेन्शनबाबत माहिती घेण्यासाठी एका 75 वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाने कस्टमर केअरला संपर्क साधला. पण हा कॉल कस्टमर केअरऐवजी सायबर भामटय़ांच्या जाळ्यात सापडला. मग अज्ञात कॉलधारकांनी शिताफीने त्या वृद्धाच्या बँक खात्यातील सहा लाख 80 हजार रुपये दुसऱया खात्यावर वळते करून फसवणूक केली.
वामन कोळी (75) असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त वृद्धाचे नाव आहे. कोळी हे बीएआरसीमधून सेवानिवृत्त झाले आहेत. 15 वर्षांनी वाढ झालेल्या पेन्शनच्या माहितीकरिता त्यांनी कस्टमर केअरला संपर्क साधला होता. त्या वेळी आकाश वर्मा नावाच्या व्यक्तीने कॉल उचलला व त्याने दुसऱया व्हॉट्सअप क्रमांकावर फोन करण्यास सांगितले. त्यानुसार कोळी यांनी दुसऱया क्रमांकावर संपर्क साधल्यावर आकाश नावाच्या व्यक्तीने बोलण्यात गुंतवून कोळी यांच्या बँक खात्यातून 44 हजार 444 रुपये दुसऱया खात्यात वळते करून घेतले. त्यानंतर पुन्हा तीन टप्प्यांत मिळून 11 लाख 69 हजार रुपये कोळी यांच्या बँक खात्यातून दुसऱया बँक खात्यात वळते करून घेतले. त्यापैकी चार लाख 90 हजार अज्ञात व्यक्तींनी पुन्हा कोळी यांच्या बँक खात्यात पाठवून उर्वरित सहा लाख 79 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात दोघा भामटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.