Published on
:
16 Nov 2024, 12:43 am
Updated on
:
16 Nov 2024, 12:43 am
आटपाडी : विश्वासघात कोणी केला यावर मी बोलत नाही. परंतु, जनतेच्या मनातील सरकार यावे, अशी जनतेची इच्छा होती. अडीच वर्षांपूर्वी सरकार बदलले नसते, तर एवढा मोठा निधी आला असता का? विकासकामे झाली असती का?, असा सवाल करीत, लाडक्या बहिणींना विरोध करणार्यांना जोडा दाखवा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथे महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी सुहास बाबर, खासदार धैर्यशील माने, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी गरिबी पाहिली आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना पंधराशे रुपयांची किंमत काय कळणार? दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. कुणीही माई का लाल आला तरी या योजना बंद पडू देणार नाही. लाडक्या बहिणींना सावत्र भावांनी विरोध केला, कोर्टात गेले. कोर्टाने चपराक लगावल्यावर दुसर्या कोर्टात गेले. आता त्यांना जोडे दाखवा.
ते म्हणाले, आमची देना बँक आहे, घेना बँक नाही. पूर्वीच्या सरकारमध्ये काहीजण हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारे होते. परंतु आमचे सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे देणार आहे. खानापुरात 8 महिन्यांत 1350 कोटी रुपयांचा निधी दिला. त्याच्या आधी अडीच वर्षांत निधीच मिळाला नाही. सर्व राज्यांतील मतदारसंघात भरघोस निधी मिळाल्याने विकास कामांना गती मिळाली आहे. ते म्हणाले, 370 कलम हटविल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील लाल चौकात आता तिरंगा फडकतोय. मोदी सरकारने हा बदल केला. खानापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, त्यांना मंत्रिपद देऊन मतदारसंघातील मंत्रिपदाचा दुष्काळ संपवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. खासदार धैर्यशील माने यांनी देखील बाबर यांच्या मंत्रिपदाला दुजोरा दिला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अनिल बाबर यांची उणीव जाणवते आहे. लोकांसाठी काम करणारा हा नेता लोकांसाठी राबला. उठावावेळी ते खांद्याला खांदा लावून उभे राहिले. टेंभूच्या पाण्यासाठी त्यांनी राजकारणविरहित काम केले. सुहास बाबर यांना विजयी करणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. बाबर आणि परिवार ही माझी जबाबदारी आहे. तानाजी पाटील हा त्यांचा पाठीराखा जिवाला जीव देणारा किंगमेकर आहे. अशी माणसं दुर्मीळ असतात. त्यांनाही राज्यस्तरावर मोठी जबाबदारी देऊ. या परिसरात एमआयडीसी आणि कारखाना देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
सुहास बाबर म्हणाले, जनतेच्या भल्यासाठी अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मतदारसंघाचा विकास झाला. टेंभू योजनेचा सहावा टप्पा मंजूर झाल्याने जनतेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांनी पाणी आणले आणि दुष्काळ हटला. अनिल बाबर यांच्यावर विरोधकांनी टीका केली, पण टेंभूचे दिवास्वप्न आता पूर्ण होत आहे. एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही.