पालखी मार्गाच्या कामाचा आढावा घेताना अधिकार्यांना सूचना करताना ना. शिवेंद्रराजे भोसले.Pudhari Photo
Published on
:
24 Jan 2025, 12:08 am
Updated on
:
24 Jan 2025, 12:08 am
सातारा : पैठण, पंढरपूर व खरवंडी ते नवगण राजूरी या रस्त्यांच्या दुपदरीकरणाची कामे दर्जेदार करा आणि ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिल्या.
बांधकाम भवन येथे शेवगाव पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्ग 752 ई पैठण पंढरपूर (पालखी मार्ग) व राष्ट्रीय महामार्ग 361 एफ खरवंडी ते नवगण राजूरी या महामार्गाच्या अडचणी संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. मोनिका राजळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते (बांधकामे) यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग 752 ई पैठण ते शिरुर रस्त्याचे दुपदरीकरण करण्याच्या कामात ज्या गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. त्याठिकाणी संबंधितांनी स्थानिकांना विश्वासात घेऊन भूसंपादनाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे. ज्या भागात काम सुरु झाले आहे, त्याठिकाणी संबधित कंत्राटदारांनी गांभीर्याने कामाचा दर्जा राखावा. विहीत कालमर्यादेत काम पूर्ण करण्यावर कटाक्षाने लक्ष द्यावे. ज्या गावातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्याचा मोबदला मिळण्याबाबतचा प्रस्ताव संबंधितांनी सादर करावा. मार्च- एप्रिल 2025 पर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन अहिल्यानगर जिल्ह्यातील उर्वरित लांबीचे रस्त्याचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही ना. शिवेंद्रराजेंनी केल्या.
राष्ट्रीय महामार्ग खरवंडी ते नवगण राजूरी रस्त्याचे दुपरदरीकरणाच्या कामास गती देण्यात यावी. या भागातील 14.30 किमी लांबीमधील अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने यंत्रणा कार्यान्वित करावी. अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्या गावांचे अंतिम निवाडा त्रुटीच्या पूर्ततेसाठी प्रलंबित आहे, त्यासंदर्भात स्थानिक जिल्हाधिकारी यांना विभागाने पत्र देऊन या कामासंदर्भातील बाबी पूर्ण कराव्या. या सर्व कामांची गुणवत्ता व गती याची विभागाने पडताळणी करावी, अशा सूचना ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी अधिकार्यांना दिल्या.