बेळगाव : काँग्रेस पदाधिकार्यांना सूचना करताना रणदीप सूरजेवाला. शेजारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, विनय नावलगट्टी आदी मान्यवर.Pudhari File Photo
Published on
:
18 Jan 2025, 12:51 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:51 am
बेळगाव : बेळगावात मंगळवारी (दि. 21) काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व कर्नाटक प्रभारी खासदार रणदीपसिंग सुरजेवाला शुक्रवारी (दि. 17) काँग्रेस भवनात आले होते. त्यांच्यासमोरच कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाल्याने जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी उघड झाली.
काँग्रेसने 21 जानेवारी रोजी बेळगावात जय बापू, जय भीम, जय संविधान या नावाने मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस भवनात बैठक झाली. व्यासपीठावर खासदार सुरजेवाला यांच्यासह पालकमंत्री सतीश जारकीहोळी व इतर मान्यवर उपस्थित होते. बैठक सुरु होताच काही कार्यकर्त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले जात नाही असा आरोप करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रत्येकाने शांत राहून आपली मते मांडावीत, असे आवाहन खासदार सुरजेवाला यांनी केले. मात्र, कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पालकमंत्री जारकिहोळी यांनीही कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे, गोंधळ वाढतच गेला. सामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही. नेतेमंडळी केवळ काही मोजक्याच कार्यकर्त्यांना जवळ करतात, असा आरोपही करण्यात आला. एकमेकांवर आरोपप्रत्यारोप केले जात होते. शेवटी खासदार सुरजेवाला यांनी सर्वांनी एकत्रितपणे राहून हा मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले. बैठकीला जिल्ह्यातील आमदार तसेच काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.