अटक केलेले तिघे संशयित. Pudhari File Photo
Published on
:
28 Nov 2024, 11:54 pm
Updated on
:
28 Nov 2024, 11:54 pm
बेळगाव : आधी एकीवर प्रेम, त्यानंतर तिला सोडून दुसरीशी जवळीक, अशा प्रेमत्रिकोणातून अंजनेयनगर येथील गोळीबार झाल्याचे पोलिस अधिकारी सांगत आहेत. परंतु, आर्थिक व्यवहार अथवा तरुणीच्या छेडछाडीतून दोघांनी हा गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिस नेमके काय लपवत आहेत, याबाबत अद्यापही संदिग्धता आहे. माळमारुती पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना अटक केली आहे. तथापि, त्यांची ओळख जाहीर केलेली नाही.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोळीबारात जखमी झालेला प्रणीतकुमार (वय 31, मूळ रा. कारवार, सध्या रा. द्वारकानगर, टिळकवाडी) हा त्याची मैत्रीण स्मिता हिच्या घरी अंजनेयनगर येथे जेवणासाठी गेला होता. पूर्वी प्रणीतकुमार हा निधा नामक तरुणीवर प्रेम करत होता. परंतु, वर्षभरापूर्वी त्यांचे संबंध फिस्कटले. तेव्हापासून त्याची स्मिता हिच्याशी मैत्री जुळली होती. तरीही तो निधाच्या अधूनमधून संपर्कात होता. बुधवारी रात्री जेवताना प्रणीतकुमार हा निधाची आठवण येत असल्याचे सांगत स्मितासमोर रडत होता. तेव्हा तेथून जवळच राहणार्या निधाला स्मिताने घराकडे बोलावून घेतले. त्या दोघांमधील वाद मिटवावा, या उद्देशातून स्मिताने त्यांना बोलावून घेतल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
तिघांची चर्चा सुरू असताना अचानक एक तरुणी व दोघे तरुण तेथे आले. त्यांनी प्रणीतकुमारशी भांडण सुरू केले. यावेळी दोघांपैकी एका तरुणाने सोबत आणलेल्या पिस्तुलातून प्रणीतकुमार याच्यावर गोळी झाडली. डोक्याच्या दिशेने झाडलेली ही गोळी प्रणीतने चुकवण्याचा प्रयत्न केला. परंतु, कानाजवळून जाऊन ती भिंतीला धडकली अन् पुन्हा माघारी फिरून मांडीला लागून खाली पडली. यामध्ये तो जखमी होऊन खाली कोसळल्याचे पाहून हल्लेखोर निघून गेले. यानंतर स्मिताने त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी तिघांना अटक केल्याचे सांगितले आहे. यामध्ये दोन महिलांसह एका तरुणाचा समावेश आहे. सध्या पोलिसांनी अटक केलेल्यापैकी दोन तरुणी कोण, अटक केलेल्यांमध्ये दोघे बहीण-भाऊ आहेत. त्यामुळे या घटनेशी त्यांचा संबंध काय, याबाबत पोलीस तपास सुरू आहे, इतकेच सांगत आहेत. निधा, स्मिता व प्रणीतकुमार चर्चा करत असताना आलेले ते तिघे कोण, त्यांचा निधा अथवा अन्य दोघांशी संबंध काय, त्यांना कोणी बोलावले होते की ते स्वतःहून आले होते. याबाबत पोलिसांकडून अद्याप तरी स्पष्टपणे काहीच सांगितले जात नाही.
आर्थिक व्यवहार, छेडछाडीचा संशय
पोलिसांनी याची अपूर्ण माहिती दिली असल्याने काही बाबतीत संदिग्धता आहे. त्यामुळे नेमका गोळीबार कशामुळे झाला व तो कोणत्या कारणातून झाला, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. आर्थिक व्यवहार अथवा एका तरुणीच्या छेडछाडीतून ही घटना घडल्याची चर्चा सध्या सुरू आहे. सुरवातीला हे भांडण आझमनगर परिसरात झाले व गोळीबार अंजनेयनगर परिसरात झाल्याचेही सांगितले जात आहे. परंतु, पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी जिल्हा रूग्णालयाला भेट देऊन रूग्णाची विचारपूस केली. त्याच्या मांडीला गोळी लागल्याने किंचितशी जखम आहे. परंतु, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले. घटना घडल्यानंतर कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक, माळमारुतीचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्यासह अन्य अधिकार्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच रूग्णालयात जाऊनही जखमीची जबानी घेतली.