प्लेलिस्ट- आत्मीय सुरांचे सोबती

2 hours ago 2

>> हर्षवर्धन दातार

स्वर्गीय व सुरेल अशा बासरी वाद्याच्या सोबतीने अनेक गाण्यांनी रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. या बासरी वादकांचे योगदान मोलाचे. निष्णात बासरी वादकांनी आपल्या वादनाने तसेच प्रयोगशील प्रयत्नांनी बासरीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. असेच काही ज्येष्ठ बासरीवादक आणि त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱया प्रयोगांचा आढावा.

गेल्या भागात आपण अनेक गाण्यांतून बासरीचा व्यापक आणि प्रासंगिक वापर ऐकला. या फुंकवाद्याकरिता आपण ‘फ्लूट’ आणि ‘बासरी’ असे दोन शब्द ऐकतो. क्लासिकल फ्लूटमध्ये 15 छिद्रे आणि खुंटय़ा (Keys) असतात आणि बासरी ही बांबूपासून बनविली जाते आणि त्यात आठ छिद्रे असतात. पट्टी आणि सुरांच्या गरजेनुसार बांबूची लांबी आणि छिद्रांतील अंतर कमी जास्त करतात. बासरी ही बाजूने फुंकून वाजवली जाते, तर फ्लूट हे सरळ एक बाजूने फुंकून वाजवतात. पारंपरिक बासरीतून अडीच सप्तक सूर येतात, तर क्लासिकल फ्लूटची मजल तीन सप्तकांपर्यंत जाते.

लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या सांगीतिक सफरीला कलाटणी देणारा संगीतप्रधान चित्रपट ‘दोस्ती’ (1964). यात मित्रवियोगाला वाचा देणाऱया आणि रफींनी गायलेल्या ‘चाहुंगा मैं तुझे’ या अतिशय दर्दभऱया गाण्याला बासरीचे सूर अधिकच आर्त करतात. प्रयोगशील संगीतकार राहुल देव बर्मन नेहमीच वेगळा साऊंड घेऊन आले. विविध वाद्यांचा उपयोग ही त्यांच्या संगीताची ओळख.

आपल्या उमेदवारीच्या काळातील ‘बहारो के सपने’ (1967) चित्रपटातील ‘आजा पिया तोहे प्यार दू’ गाण्यातील मधल्या (इंटरल्यूड) संगीतात फ्लूटचा अनोखा वापर केला. परिस्थितीला थकलेल्या, निराश नायकाला दिलासा देणाऱया या गीतात फ्लूटचे सूर धीर देतात. पंचमदांचे संगीत असलेल्या ‘इजाजत’मध्ये (1987) ‘खाली हाथ शाम आई है’ या गाण्यात रोणू मुजुमदार यांच्या बासरीचे सूर एकाकीपणाची जाणीव करून देतात. त्यांच्याच ‘तिसरी मंझिल’ (1966) या पहिल्या ब्लॉकबस्टर चित्रपटात ‘ओ हसीना जुल्फोवाली जाने जहां’मध्ये मेटल फ्लूट ऐकू येते. एका विशिष्ट सुरातली हीच मेटल फ्लूट पंचमदांनी ‘मेरे जीवनसाथी’मध्ये (1972) यातील ‘आओ ना, गले लगा लो ना’मध्ये आणि सलील चौधरींनी ‘उसने कहां था’मध्ये (1960) यातील ‘आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत’ यात सुंदर योजली आहे.

अष्टपैलू मनोहारी सिंग यांचा अनेक वाद्यं वाजविण्यात हातखंडा होता. सॅक्सोफोनबरोबर मनोहारी सिंग हे उत्तम की-फ्लूट आणि पिकोलोसुद्धा वाजवत. सचिन देव आणि राहुल देव या बर्मन पितापुत्रांच्या सान्निध्यात त्यांचे सूर आसमंतात वाजले. सलील चौधरींच्या ‘छोटी सी बात’ (1976) यातलं ‘जानेमन जानेमन’, पंचमदांचं ‘घर’ (1978…‘फिर वही रात है’) आणि ‘जीवा’ (1986…‘रोज रोज आँखो तले’) या सर्व गाण्यांत त्यांची की-फ्लूट वाजली आहे. ‘दुल्हन एक रात की’ (1967) यात रफींनी गायलेल्या ‘एक हसीन शाम को दिल मेरा खो गया’ गाण्यातील संगीतात मनोहारी सिंग यांची की-फ्लूट वेगळाच रंग भरते. बासरीचे वरच्या पट्टीतील सूर शंकर-जयकिशननी ‘श्री 420’ (1955) यातील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या अतिशय लोकप्रिय अमर प्रेमगीतात वापरून गाण्याला एक वेगळा रंग दिला. असाच प्रयोग ओपी नय्यरनी ‘जवानीया ये मस्त बिन पीये’ या ‘तुमसा नही देखा’मधील (1957) गाण्यात केला. जागतिक कीर्तीचे बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया यांनी आपल्या बासरी वादनाने अनेक गाण्यांना एक सुरेल किनार प्रदान केली, त्यांची शोभा वाढवली. शास्त्राrय संगीतातसुद्धा त्यांनी कित्येक संस्मरणीय मैफली गाजवल्या.

संतूर वादक शिवकुमार शर्मांबरोबर ‘शिव-हरी’ या नावाने चित्रपटांना संगीत दिलं. मदनमोहन यांच्या ‘जहाँआरा’मध्ये (1964) ‘फिर वही शाम’, सचिन देव बर्मनबरोबर ‘अभिमान’ (1974) या संगीतप्रधान विषय आणि संगीतात ‘पिया बिना बासिया’ आणि ‘तेरी बिंदिया रे’, राहुल देव बर्मन यांच्या ‘अमर प्रेम’ (1970… ‘रैना बीती जाये’) ही सर्व गाणी हरीजींच्या बासरीच्या सुरांनी अमर झाली. ‘चिंगारी कोई भडके’ हे राहुल देव बर्मन – किशोर कुमार जोडीच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक. हुगळी नदीत पाण्याच्या हेलकाव्यांबरोबर ऐकू येणारे हरिजींच्या बासरीचे सूर गीतकार आनंद बक्षींच्या शब्दांमार्फत कथेतील दुःख आपल्यापर्यंत पोहोचवतात. ‘बांशी शूने की घोरे थाका जाये’ या बंगाली गैरफिल्मी गाण्यात तर आशाताई आणि रोणू मुजुमदार यांच्या बासरी वादनाची जुगलबंदी आहे. ‘राजपूत’ (1982) यातील रफींनी गायलेल्या ‘कहानीया सुनाती है, पवन आती जाती’ यात बासरीचे सूर वातावरणाला शांत, धीरगंभीर आणि चिंतनशील करतात. अमिताभ बच्चननी गायलेल्या ‘मिस्टर नटवरलाल’मधील (1979) ‘मेरे पास आओ’ या सर्व थरांत गाजलेल्या गोड बालगीतात सुरुवातीला बासरीचे सूर आपल्याला निसर्गरम्य आणि शांत जंगलातच घेऊन जातात.

हृदयनाथ मंगेशकरांच्या ‘मोगरा फुलला’ यात हरिजींच्या बासरीचे सूर एक आध्यात्मिक शांती निर्माण करतात, तर ‘तरुण आहे रात्र अजुनी’ गाण्यात प्रेमाचे मार्दव. ब्रिजभूषण काबरा आणि प्रख्यात संतूर वादक शिवकुमार शर्मा यांच्याबरोबर पद्मविभूषण हरीजींनी ‘कॉल ऑफ व्हॅली’ या शास्त्राrय संगीतावर आधारित एका अप्रतिम अल्बमची निर्मिती केली. नमूद करायची गोष्ट म्हणजे हरिप्रसाद चौरासियांना फिल्म संगीतात आणण्यामागे अशोक पत्कींचा मोठा सहभाग होता. हिंदी चित्रपटात गाण्याच्या साथीला आपली सर्वप्रथम बासरी वाजविण्याचे त्यांना फक्त तीस रुपये मिळाले होते.

संगीत नाटक अकादमीपुरस्कृत रोणू मुजुमदार हे कल्पक आणि सृजनशील कलाकार म्हणून ओळखले जातात. ‘मोन-माझी’ (बंगाली) आणि ‘ओ मांझी तेरी नय्या’… (‘आरपार’, 1985), ‘1942- अ लव्ह स्टोरी’ (1994) यातलं ‘कुछ न कहो’ आणि ‘जमीन आसमान’मधील (1985) अतिशय कठीण चाल असलेलं ‘ऐसा समा न होता’ या सर्व गाण्यांत बासरी रोणू मुजुमदारनी वाजवली आहे.

देवेंद्र मुर्डेश्वर, रघुनाथ सेठ, विजय राघवराव या निष्णात बासरी वादकांनी आपल्या वादनाने तसेच प्रयोगशील प्रयत्नांनी बासरीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं. अलीकडच्या काळात जेव्हा संगीत यांत्रिक आणि तांत्रिक झालं आहे, अशा वेळेस अमर ओक (झी सारेगम लिट्ल चॅम्प्स), मोहित शास्त्राr आणि नवोदित युवक निनाद मुळावकर यांच्यासारखे प्रतिभाशाली वादक बासरीच्या स्वर्गीय, सुरेल सुरांची परंपरा राखत आहेत. नव्हे, वृद्धिंगत करत आहेत. जाणते आणि बहुमुखी संगीत अभ्यासक सुहास किर्लोस्कर यांच्या ‘गाता रहे’ या माहितीपूर्ण पुस्तकाच्या माध्यमातून या वाद्याविषयीच्या लेखमालेकरिता माहिती आणि संदर्भ खूप उपयोगी पडले. त्याबद्दल हा ऋणनिर्देश करणे क्रमप्राप्त ठरते.

z [email protected]

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article