Published on
:
19 Nov 2024, 7:07 am
Updated on
:
19 Nov 2024, 7:07 am
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : फोटो एकाचा, नाव अन् क्रमांक दुसऱ्याचे असे बनावट आधार कार्ड तयार करून देणाऱ्या दोघांना सिटी चौक पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. ही कारवाई शनिवारी (दि. १६) दुपारी साडेचारच्या सुमारास बुड्ढीलाईन भागात करण्यात आली. अरबाज बाबूखान (२१, रा. फातेमानगर, हसूल) आणि मोहम्मद फैसल मोहम्मद राजेक (१९, रा. रोशन गेट) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली. दरम्यान, धक्कदायक म्हणजे बोगस मतदान, जमिनीची बोगस रजिस्ट्री जमानत घेण्यासाठी या बनावट आधार कार्डाचा वापर केला जात असावा असा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे.
आरोपी अरबाज हा पैसे घेऊन संगणकावर बनावट नावांचे आणि क्रमांकाचे आधारकार्ड तयार करून देत असल्याची माहिती सिटी चौक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा लावला. आकाश नावाच्या एका व्यक्तीला त्याचा फोटो देऊन अरबाजकडे बनावट आधारकार्ड तयार करण्यासाठी पाठविले. अरबाज याने आधार कार्ड तयार करून ते देण्यासाठी आकाश यांच्याकडे येताच उपनिरीक्षक अर्जुन कदम, निवृत्ती गायके, जमादार मिसाळ, अंमलदार राजेंद्र साळुंके, आनंद वाहूळ, टेकले, इप्पर, त्रिभुवन यांच्या पथकाने अरबाजला रंगेहाथ ताब्यात घेतले. दरम्यान, दोघांना न्यायालयात हजर केले असता २१ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.
नारेगावच्या एका दुकानात बनवायचे आधार
ग्राहक आकाश यांनी अरबाजला डमी त्यांचा फोटो दिला होता. त्यावरून अरबाज याने रिजवान रज्जाक शेख या नावाने बनावट क्रमांकाचे आधार कार्ड तयार करून दिले. हे त्याने नारेगाव येथील मोहम्मद फैजलच्या सरकार मल्टिसर्व्हिसेस या दुकानात तयार केले. पोलिसांनी फैजलच्या दुकानात छापा मारून त्याला ताब्यात घेतले. दुकानातील सर्व साहित्य जप्त केले. गेल्या सहा महिन्यांपासून दोघेजण बनावट आधार कार्ड तयार करून देत असल्याचे समोर आले आहे.