कडेगाव : येथे विजयानंतर काँग्रेसचा झेंडा फडकवताना आमदार डॉ. विश्वजित कदम.Pudhari File Photo
Published on
:
24 Nov 2024, 12:18 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:18 am
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-महाआघाडीचे उमेदवार आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी 30 हजार 64 मतांनी विजय संपादन करीत विरोधक महायुती-भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा पराभव केला. या विजयाने आमदार डॉ. कदम यांनी काँग्रेसचा, पलूस - कडेगाव मतदारसंघाचा बालेकिल्ला राखण्यात यश मिळवले.
पलूस-कडेगाव मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघावर डॉ. पतंगराव कदम यांचे सलग 30 वर्षे निर्विवाद वर्चस्व राहिले. त्यांच्या पश्चात डॉ. विश्वजित कदम यांनीही मतदारसंघात मोठे काम उभारले. येथे 1995 पासून आजपर्यंत कदम विरुद्ध देशमुख गट असाच पारंपरिक संघर्ष राहिला. केवळ 2019 मध्ये युतीकडून ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांनी माघार घेतली होती. मात्र या निवडणुकीत हा पारंपरिक संघर्ष पुन्हा पाहायला मिळाला. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. मागील लढतीत डॉ. विश्वजित कदम यांच्याविरोधात शिवसेनेचे संजय विभुते रिंगणात होते. शिवसेनेची ताकत याठिकाणी मर्यादित होती. मात्र या निवडणुकीत कदम विरुद्ध देशमुख असा सामना राहिल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती.
काँग्रेसने पहिल्यापासूनच जोरदार तयारी चालविली होती. प्रचारासाठी माजी आमदार मोहनराव कदम व आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी सर्व यंत्रणा हाताळली. माजी आमदार मोहनराव कदम, डॉ. शिवाजीराव कदम, रघुनाथ कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, डॉ. जितेश कदम यांनी मतदारसंघ पिंजून काढला. डॉ. विश्वजित कदम यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला होता. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापासूनच कदम यांनी मोठी मुसंडी मारली होती. काँग्रेसच्यावतीने या निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, इम्रान प्रतापगढी, प्रणिती शिंदे आदी दिग्गजांच्या सभा झाल्या. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आ. अरुण लाड आणि शरद लाड यांनीही आघाडी धर्माचे पालन करीत डॉ. कदम यांना मोठी साथ दिली.
संग्रामसिंह देशमुख यांनी अत्यंत शांततेत प्रचार यंत्रणा राबविली. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सतीश देशमुख, विश्वतेज देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या जोरदार सभा झाल्या. परंतु विजयापर्यंत पोहोचण्यात ते अयशस्वी ठरले.