स्वच्छतेसाठी हजारो हात सरसावले; विभागात सर्व बसस्थानकात अभियान
सातारा बसस्थानकात साफसफाई करताना रोहन पलंगे व अन्य अधिकारी.Pudhari Photo
Published on
:
24 Jan 2025, 12:20 am
Updated on
:
24 Jan 2025, 12:20 am
सातारा : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागामार्फत सातारा जिल्ह्यातील सर्व बसस्थानकात गुरुवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सातारा बसस्थानकात सकाळी स्वच्छतेसाठी हात सरसावल्याने बसस्थानकाला झळाळी प्राप्त झाली होती. त्यामुळे बसस्थानक परिसर चकाचक दिसत होता.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाने राज्यात सर्वत्र बसस्थानक, बसस्थानक परिसर व प्रसाधनगृहांची सखोल स्वच्छता मोहीम एकाचवेळी राबवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सातारा विभागातील सातारा, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, पाचवड, मेढा, भुईंज, पारगाव-खंडाळा, शिरवळ, लोणंद, वाठारस्टेशन, कराड, उब्रंज, काशिळ, नागठाणे, कोरेगाव, दहिवडी, शिखर शिंगणापूर, रहिमतपूर, औंध, पाटण, डेबेवाडी, कोयनानगर, फलटण, वडूज, म्हसवड, ढेबेवाडी यासह अन्य विभागात गुरुवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
सातारा बसस्थानकावर विभागीय कार्यालय, सातारा आगार, विभागीय कार्यशाळेसह अन्य विभागातील सुमारे 150 ते 200 कर्मचारी व अधिकार्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. बसस्थानक परिसराची सुमारे दोन तास स्वच्छता मोहीम करण्यात आल्याने बसस्थानक परिसर चकाचक झाला होता. त्यामुळे नव्याने झळाळी प्राप्त झाली होती. या मोहिमेत शाळा व विद्यालयातील विद्यार्थ्यांसह प्रवाशीही सहभागी झाले होते. सातारा बसस्थानकात विभाग नियंत्रक रोहन पलंगे, विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड, जिल्हा दक्षता व सुरक्षा अधिकारी शेखर फरांदे, विभागीय अभियंता (स्थापत्य) प्रियांका काशीद, यंत्र अभियंता (चालन) विकास माने, उप यंत्र अभियंता भुषण सुर्यवंशी, भांडार अधिकारी सचिन गायकवाड, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी दत्ताजीराव मोरे, लेखाधिकारी तेजस नवले, सातारचे आगार व्यवस्थापक रत्नकांत शिंदे, स्थानक प्रमुख राहूल शिंगाडे, वाहतूक नियंत्रक रोहित दिघे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.