Published on
:
01 Feb 2025, 12:11 pm
Updated on
:
01 Feb 2025, 12:11 pm
संदीप रोडे
पंचवीसेक वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून अहिल्यानगरकडे पाहिले जायचे. मात्र मागील दहा वर्षांपासून सेनेचा गड ढासळण्यास सुरुवात झाली. नव्या पिढीच्या संग्राम जगताप नामक शिलेदाराने संघटन बांधणी करत शहराच्या राजकारणावर मांड ठोकली. त्याच वेळी शिवसेनेचे विभाजन झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात ती विभागली गेली. अहिल्यानगरकडे उद्धव ठाकरेंचे दुर्लक्ष झाले आणि मुख्यमंत्री, त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या सेनेने पायाभरणी करत अहिल्यानगरमधील स्थान मजबूत केले. उद्धव सेनेचे उरलेसुरले नगरसेवकही शिंदे सेनेत गेले. म्हणजेच आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून धनुष्यबाणाची दिशा स्पष्ट होत असताना मशालीचे पुढे काय अन् कसे होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिवसेना एकसंध असताना एकनाथ शिंदे यांचे अहिल्यानगरकडे कायम लक्ष असे. महापालिकेत चार वेळेस युतीची सत्ता आली. प्रत्येक वेळी शिवसेनेचा महापौर बसविण्याची किमया फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळेच झाल्याचा इतिहास आहे. सामान्य कार्यकर्त्याला पाठबळ देण्याचा भाईंचा स्वभाव. नगरला जेव्हा जेव्हा महापौरपदाची निवडणूक व्हायची तेव्हा तेव्हा भाईंनी नगरला ठाण मांडल्याचे अनेकांच्या स्मरणातून आजही जात नाही. त्यामुळेच महापालिकेवर भगवा फडकायचा. उद्धव ठाकरेंचे मात्र तसे नाही. अहिल्यानगरला ते क्वचितच यायचे. बाकी सगळा कारभार उपनेते, संपर्क प्रमुखांसारख्या दूतांवासांच्या भरवशावर. अहिल्यानगरचं कसं, ‘दूतावास सांगतील तसं’, या ठाकरेंच्या पद्धतीमुळे स्थानिक शिवसैनिकाच्या पदरी कायमच निराशा पडे. गत विधानसभा निवडणुकीवेळी तर कहरच झाला. मविआतील जागावाटपात अहिल्यानगर मतदारसंघ उबाठा सेनेला मिळावा यासाठी स्थानिक शिवसैनिकांनी जीवतोड मेहनत घेतली; मात्र झाले उलटेच. ठाकरेंनी अहिल्यानगरचा दावा सोडला अन् श्रीगोंद्याला ‘भाव’ दिला. श्रीगोंद्यात शिवसेनेला ‘बेस मास’ नसतानाही ‘साजन’प्रेम गलबलून आले. अहिल्यानगरला मात्र भरभक्कम बेस मास, हे ठाऊक असतानाही ठाकरेंनी घेतलेला निर्णय अहिल्यानगरमधील शिवसेना अधोगतीच्या मार्गाला लागल्याचे लक्षण ठरला. गुरुवारी त्यावर शिक्कामोर्तबच झाले.
‘नगरविकास’ शिवसेनेसाठी पर्वणी!
राज्य मंत्रिमंडळात नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. आरक्षणाच्या मुद्द्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडत आहेत. सुप्रीम कोर्टात तारखांवर तारखा सुरू आहे. या निकालानंतर वार्डरचना, आरक्षण, मतदारयादी अशी प्रक्रिया पार पडेल. नगरविकास खाते शिवसेनेकडे असल्याने शिवसेनेच्या इच्छुकांसाठी ती ‘पर्वणी’ मानली जाते. त्यांना हवी तशी वार्डरचना झालीच तर सासरे-जावई यांचे गुळपीठही शिवसेनेला सत्तेपासून रोखू शकणार नाहीत, हेही ध्यानात घेतले पाहिजे.
अहिल्यानगरचे शिवसेना आमदार म्हणून अनिल राठोेड यांनी पाच टर्म गाजविल्या. दुर्दैवाने ते ईहलोकी गेल्यानंतर शिवसेनेचं काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला. दुसर्या फळीतील नेत्यांनी भगवी पताका खांद्यावर घेत संघर्ष सुरू ठेवला, मात्र त्यांच्या संघर्षाला मुंबईतून पाठबळ मिळाले नाही. याच दरम्यान एकनाथ शिंदेंसारखा नेता मात्र त्यांना आपलासा वाटू लागला. शिंदे सेनेत जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव, संपर्कप्रमुख दिलीप सातपुते यांनी स्थानिक नगरसेवक, शिवसैनिकांशी चर्चा करत ब्रेनवॉश केला अन् त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश झाला.
हे सांगण्याचा मुद्दा इतकाच की आगामी अहिल्यानगर महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसायचा, या दृष्टीने उपमुख्यमंत्री तथा सेनेचे नेते एकनाथ शिंदे हे पाऊल टाकत आहेत. विनर कॅन्डिटेडचा शोध घेत त्यांना आपलेसे करत आहेत. त्यात ते सक्सेसही होत आहेत. नगर शहरात शिवसेनेचा चाहता मतदार वर्ग आहे. त्यातच होणारे इनकमिंग पाहता भविष्यात शिवसेनेचा महापौर विराजमान झाल्यास नवल वाटायला नको.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आता माजी महापौर भगवान फुलसौंदर, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे आणि विक्रम राठोड यांच्यासारखे मोजकेच नेते शिल्लक राहिले आहेत. आगामी महापालिका निवडणूक उद्धव सेना स्वतंत्र किंवा मविआसोबत लढली, तरी अहिल्यानगरात त्या ताकदीचे तुल्यबळ उमेदवार शोधताना त्यांची दमछाक होईल, असे चित्र आजघडीला दिसते आहे. त्यामुळेच तर भविष्यात अहिल्यानगरात उद्धव सेनेचे स्थान काय अन् कसे असेल, याचे आडाखे जो-तो आपापल्या परीने बांधत आहे, पण प्रत्यक्षात रणसंग्राम सुरू झाल्यानंतरच खरे काय ते कळेल, तोपर्यंत ‘वेट अॅन्ड वॉच’ करावे लागेल!
विखे-कर्डिले-जगतापांचे गुळपीठ अन् शिंदे सेनेचे मनसुबे
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा तीन मित्रपक्षाची महायुती राज्यातील सत्तेत आहे. अहिल्यानगर महापालिकेत हे तिघेही एकत्रित लढतील असे आजचे चित्र आहे. संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार आहेत. तीन टर्मपासून ते नगरचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेनेला सोबत घेताना त्यांनाही कसरत करावी लागणार आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनाही त्यांचा महापौर करायचा असेल. जागावाटपात भरभरून वाटा घेण्याची हातोटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. त्यातच इनकमिंग पाहता त्यांना यश मिळेलही; पण मग भाजपला काय? असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे, शहरलगतचे आमदार शिवाजी कर्डिलेही भाजपचे. शिवाय कर्डिले हे आ. जगताप यांचे सासरे. या तिघांचे गुळपीठ जमलेच तर मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महापौरपदाचे मनसुबे नाकाम होण्यासही वेळ लागणार नाही.