बार्शीत कडक बंदोबस्त, स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा त्रिस्तरीय खडा पहारा:26 तास कर्तव्य बजावून इतर‎कर्मचारी परतले घरी‎

1 day ago 1
बार्शीत निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामास सर्वोच्च प्राथमिकता देत सलग २६ तास कर्तव्य बजावून घरी परतले. तसेच सील केलेली मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आली असून स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा त्रिस्तरीय खडा पहारा आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बार्शी तालुक्यात बुधवार दि २० रोजी मतदान झाले. सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा असल्याने सदरच्या सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावू देण्यात आला. यात रात्री काही ठिकाणी आठ- साडेआठ वाजेपर्यंत मतदान चालले. त्यामुळे अशा ठिकाणची व शहरापासून ३५ ते ४० किलोमीटर दूर अंतरावरील गावातून मतदान यंत्रे बार्शी शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे येण्यास उशीर झाला. त्यानंतर तेथील विविध सोपस्कार पार पाडून बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशीन जमा करण्यास पथकांना रात्री बराच उशीर झाला. कर्मचारी जसजसे येत होते, तसतसे जेवण करत होते. गुरुवारी पहाटे दीड वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांची जेवणे सुरू होती. मतदानादिवशी पहाटे साडेतीन चार वाजता कर्तव्यावर रुजू झालेले कर्मचारी निवडणुकीचे दिवसभर काम करून त्यानंतर आपले साहित्य जमा करून दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास घरी परतले. त्यांनी सलग २६ तास कर्तव्य बजावले. दरम्यान, मॉक पोल व सिलिंग दरम्यान खराब झालेल्या (कॅटेगरी सी) २२, राखीव ईव्हीएम २९६ अशा ३१८ मशीन सोलापूर रामवाडी गोदामला पाठवण्यात आल्या. तर मतदानानंतर मतदान पथकाकडून जमा झालेले ६६६ बॅलेट युनिट, ३३३ कंट्रोल युनिट व ३३४ व्ही व्ही पॅट मशीन शासकीय धान्य गोदाम येथील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्रॉंग रूम सील करण्यात आली आहे. स्ट्रॉंग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे. बाह्य परिसरामध्ये जिल्हा पोलीस दलाचा एक अधिकारी व आठ पोलीस कर्मचारी, मध्य परिसरामध्ये राखीव पोलीस दलाचे दोन अधिकारी व २८ अंमलदार अशी एक तुकडी तर एकदम आतला परिसरमध्ये इंडो तिबेटियन पोलिसांची ३० जवानांची एक तुकडी असा सशस्त्र तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा दिवस रात्र खडा पहारा आहे. निवडणूक निरीक्षक निधी निवेदिता यांनी गुरुवारी स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. निवडणूक कर्मचाऱ्यांची जेवणाची आबाळ निवडणूक कर्तव्यावर हजारो कर्मचारी आहेत. जिल्हास्तरावरून टेंडर काढून या सर्व कर्मचाऱ्यांची जेवणाची सोय शासकीय धान्य गोदाम येथे करण्यात आली आहे. सुरुवातीलाच जेवणाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यात कांहीशी सुधारणा झाली. एकंदरीत, कर्मचाऱ्यांची जेवणाची आबाळ झाली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article