Published on
:
29 Nov 2024, 11:58 pm
Updated on
:
29 Nov 2024, 11:58 pm
माढा : आयुर्वेदिक औषध देण्याच्या नावाखाली रुग्णांच्या जीविताशी खेळ करून दोनशे ते एक हजार रुपये फी घेऊन गरिबांची आर्थिक लूट करून तपासणी शिबिरे घेणारी टोळी माढा तालुक्यात सक्रिय असल्याचे वृत्त दै. ‘पुढारी’त प्रसिद्ध होताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. ताब्यात घेतलेली औषधे तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत.
या प्रकरणाची गंभीर दखल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश खांडेकर यांनी घेतली आहे. संबंधित मंडळी उपचारासाठी ग्रामीण भागात जाऊन गरीब रुग्णांना शिबिराच्या माध्यमातून तपासणी करून पैसे घैऊन देत असलेली औषधे आरोग्य विभागाने ताब्यात घेतली होती. ही पावडरयुक्त औषधे डॉ. खांडेकर यांनी गुरुवारी सोलापूर येथील फुड अॅन्ड ड्रग्ज विभागाकडे तपासणीसाठी पाठवली आहेत. अशी शिबिरे घेणार्या संबंधित टीमकडे तपासणी व औषध वाटपाबाबत कोणाची परवानगी घेतली होती किंवा कशाच्या आधारावर तपासणी शिबिरे घेतली. कोणत्या वैद्यकीय पदवीच्या आधारे रुग्णांची तपासणी केली. या संदर्भातील कागदपत्र तपासणीसाठी संबधितांकडे आरोग्य विभागाने मागितली आहेत.
उंदरगावातील गणपती मंदिरातच शिबिर सुरू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते किरण पवार यांनी आरोग्य विभागाकडे केली होती. त्यानंतर माढा पोलिसांनी या संबंधितांना माढा पोलिस ठाण्यात आणले होते. मात्र, कारवाईविना आरोग्य विभागाने त्यांना सोडून दिले होते. या विरोधात माध्यमांनी आवाज उठवला होता.
गुरुवारी मी ताब्यात घेतलेली पावडरयुक्त असलेली औषधे तपासणीला पाठवली असून, कोणत्या वैद्यकीय विभागातील कागदपत्रांच्या आधारे शिबिरे घेतली जातात. याबाबत माहिती मागवली आहे. कुणाचाही दबाव आला तरी कारवाईत हयगय केली जाणार नाही. दोषी आढळल्यास थेट कारवाई केली जाणार आहे.
-डॉ. अविनाश खांडेकर, तालुका आरोग्य अधिकारी