नगर : नगर शहरातील मार्केटयार्ड परिसरात भेसळयुक्त अखाद्य तीळ तेलाची विक्री करणार्या एजन्सीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा घालून कारवाई केली. सुमारे 40 हजारांच्या तेलाच्या बाटल्या भेसळीच्या संशयावरून ताब्यात घेतल्या आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी दिली.
शहरातील मार्केटयार्ड येथील एजन्सीमधून बनावट तीळ तेलाची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांच्या पथकाने एजन्सीवर छापा घातला. तिथे तीळ तेलाच्या बाटलीवर ‘तीळ’ हा शब्द मोठ्या आकारात व ‘नॉट फॉर इडिबल युज’ (खाण्यायोग्य वापरासाठी नाही) छोट्या आकारामध्ये असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर जाड आकाराच्या अक्षरामध्ये ‘तील तेल के गुणे युक्त’ असा उल्लेख आढळला. तसेच, बाटलीवर कायद्यानुसार आवश्यक असलेला लोका आढळून आला नाही. हे तेल दिव्यासाठी विक्री होत असले तरी दिशाभूल होऊन तेलाचा अन्य प्रयोजनासाठी उपयोग होण्याची शक्यता अन्न व औषध प्रशासाने व्यक्त केले. त्यामुळे सुमारे चाळीस हजार रुपयांच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
दरम्यान, तेल हे तीळ तेल नसून ‘पॅराफीन’ ऑईल आहे. त्यामध्ये फक्त एक ते दोन टक्के तीळ तेल असण्याची शक्यता आहे. सदर पॅराफीन दिव्यासाठी वापरल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणात धूर तयार होतो. तो धूर मानवी आरोग्यासाठी घातक आहे. तर काही ग्राहक या तेलाचा मालिशसाठी वापर करीत असल्याचे अन्न सुरक्षा अधिकार्यांनी सांगितले.