Published on
:
07 Feb 2025, 12:25 am
Updated on
:
07 Feb 2025, 12:25 am
रत्नागिरी : राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांना लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येण्याची ऑफर होती. राजन साळवींनी येतो, म्हणूनही सांगितले. परंतु मविआची सत्ता आल्यास मंत्रिपद मिळेल, अशी आशा होती, त्यामुळे त्यांनी प्रवेश केला नसावा, असे मत राजापूरचे आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांनी व्यक्त केले. साळवींच्या अस्थिर भूमिकेमुळे त्यांच्यासोबत जाण्यास कुणी तयार नसल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरीत आलेल्या आमदार किरण सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजन साळवी यांच्या भूमिकेविषयी मत स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीनंतर राजन साळवींना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आली होती. परंतु महाराष्ट्रात लोकसभेला मविआची आलेली लाट पाहून साळवींनी उबाठामध्ये राहणे पसंत केले. मविआची सत्ता आल्यास आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी आशा त्यांना असावी, असेही सामंत यांनी सांगितले. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला नसावा. राजन साळवी सध्या ज्या पक्षात जातील, त्या पक्षातील पदाधिकारीच आमच्या पक्षात येतील, असा विश्वासही भैय्या सामंत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पक्षात कुणाला घ्यायचे कुणाला नाही या बाबत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असेही किरण सामंत यांनी स्पष्ट केले.
अस्थिर राजकारणामुळेच ही परिस्थिती...
माजी आमदार राजन साळवी यांच्या अस्थिर राजकारणामुळेच माजी पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचेही आ. सामंत यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत त्यांच्यासोबत जाण्यास कुणीही तयार नसल्याचे देखील भैया सामंत यांनी सांगितले.