सी. टी. रवी यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरुद्ध सात वेळा अवमानकारक शब्द वापरल्याचे प्राथमिक चौकशीत उघड.Pudhari File Photo
Published on
:
18 Jan 2025, 12:46 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:46 am
बंगळूर : बेळगाव अधिवेशनात विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरुद्ध सात वेळा अवमानकारक शब्द वापरल्याचे सीआयडी पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.
राज्य प्रशासन आणि कार्मिक सुधारणा विभागाद्वारे सादर केलेल्या व्हिडीओची तपासणी केली असता आ. रवी यांनी एक अवमानकारक शब्द सात वेळा वापरल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती सीआयडी पोलिसांच्या सूत्रांनी दिली. सीआयडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चार तासांच्या व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये एकूण सात वेळा तो शब्द उच्चारण्यात आला आहे. यापूर्वी सी. टी. रवी यांनी मी कोणताही गैर शब्द वापरलेला नाही, असे सांगितले होते. त्यामुळे व्हिडीओ तपासण्यात आला.
बेळगाव सुवर्णसौधमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 19 डिसेंबर रोजी विधानपरिषदेमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला होता. शाब्दिक चकमकीदरम्यान अशोभनीय शब्द वापरून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा अपमान केल्याचा आरोप रवी यांच्यावर करण्यात आला. या घटनेनंतर मोठा गदारोळ माजला होता, शेवटी हिरेबागेवाडी पोलिस स्थानकात रवी यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले.
बंगळूरचे सीआयडी पथक बेळगावात दाखल होऊन चौकशी करून काही व्हिडीओ व संभाषणाच्या क्लिप ताब्यात घेऊन फॉरेन्सिकच्या माध्यमातून तपास केला असता रवी यांनी अपशब्द वापरल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.