राजधानी सातारा सकल मराठा बांधवांच्या शिष्टमंडळाने आ. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली त्याप्रसंगीचे छायाचित्र. Pudhari Photo
Published on
:
18 Nov 2024, 12:10 am
Updated on
:
18 Nov 2024, 12:10 am
सातारा : मराठा समाजासाठी मी नेहमीच काम करत आलो आहे. मी कायम मराठा समाजाबरोबर आहे. अगदी मराठा मूक मोर्चा व इतर आंदोलनातही मी नेहमीच सक्रिय राहिलो आहे. नागपूर अधिवेशनात मी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच सातार्यात मराठा भवन व मुलांसाठी वसतिगृह उभारणे यासाठी मी पाठपुरावा करून हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी ग्वाही सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने आ. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी आ. शिवेंद्रराजे बोलत होते.
मराठा समाजाच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला असून नागपूर अधिवेशनात सर्वप्रथम आवाज आपणच उठवलात तसेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनालाही पाठिंबा दिला आणि आरक्षणासाठी कायम पाठिंबा दिल्याबद्दल शिष्टमंडळाने आ. शिवेंद्रराजेंचे सकल मराठा समाजाच्या वतीने आभार मानले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण, सातार्यात मराठा भवन, मराठा मुलांसाठी वसतिगृह उभारणे आदी मागण्या आ. शिवेंद्रराजेंकडे करण्यात आल्या. या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा शब्द आ. शिवेंद्रराजेंनी दिला.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा-जावली मतदारसंघाचा विकास करताना सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी धरून विविध योजना राबवल्या. जनतेला चांगल्या व दर्जेदार सुविधा कशा पद्धतीने मिळतील यासाठी सातत्याने आग्रही राहिलो. माझ्या कार्यकाळात सकल मराठा समाजबांधवांचे मोठे सहकार्य लाभले. मराठा बांधवांसाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहिलो. त्यामुळे आज मराठा क्रांती मोर्चाने माझ्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याचे शिवेंद्रराजे म्हणाले.
मनोज जरांगे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे आभार
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, मराठा समाजातील आर्थिकद़ृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे. मराठा आरक्षणासाठी माझा नेहमीच पाठपुरावा सुरू असून मी कायम मराठा समाजाबरोबर आहे. सकल मराठा समाजाने मला पाठिंबा दिला. मला निवडून आणण्यासाठी मताधिक्य देण्याचा निर्णय घेतला, याबद्दल मी सकल मराठा समाज, मनोज जरांगे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचा आभारी आहे.