मलकापूरः सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला बिबट्या. Pudhari File Photo
Published on
:
08 Feb 2025, 12:42 am
Updated on
:
08 Feb 2025, 12:42 am
कराडः मलकापूर शहरातील रानडे हॉस्पिटल येथे भरवस्तीत पळत असलेला बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्याच्या पाठीमागे दोन कुत्री लागल्याचे दिसत आहे. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास बिबट्या या परिसरात दिसला. भरवस्तीत बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
काही महिन्यांपूर्वी येथील लाहोटीनगरात सुरेश इंगवले यांच्या उसाच्या शेतात दोन बछडे आणि एक मादी बिबट्याचे दर्शन झाले होते. दुसर्याच दिवशी त्या बिबट्याने घराजवळच पाळीव श्वानावर हल्ला केला होता. नागरिकांनी आरडा ओरडा केल्यावर बिबट्याच्या कळपाने उसाच्या शेतात धूम ठोकली. त्यावेळी तिसर्या दिवशी रात्री तर मोकळ्या रानातच फिरताना बिबट्याचे दर्शन झाले होते. नागरिकांनी हुसकाऊन लावल्यानंतर उसाच्या शेतात बिबट्या गेला होता. त्यानंतर गणेश रेसिडेन्सी इमारतीजवळ शेलार यांची शाळुची शेती आहे. या मोकळ्या शेतातूनच सकाळी सात वाजता बिबट्या इकडून तिकडे पळत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर मात्र अनेक महिन्यांपासून बिबट्या दिसला नव्हता. शुक्रवारी सकाळी चारच्या सुमारास रानडे हॉस्पिटलच्या परिसरात बिबट्याचा पाठलाग करताना दोन कुत्री सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. त्यानंतर बिबट्याचा वावर पुन्हा सुरू झाला असल्यास चर्चा दिवसभर शहरात सुरु होती.
कराड तालुक्यातील ग्रामीण भागात वावरणारा बिबट्या आता शहरातील मध्य नागरी वस्तीत आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बिबट्याच्या पायाचे दिसले ठसे...
मलकापूर शहरातील भर वस्तीत बिबट्या व दोन कुत्री सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर वन विभागाच्या अधिकार्यांनी त्वरित याची दखल घेत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील नागरिकांशी संवाद साधून माहिती घेतली. तसेच परिसराची पाहणी करत असताना त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले असल्याचे घटनास्थळी भेट दिलेल्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले.