Published on
:
08 Feb 2025, 12:48 am
Updated on
:
08 Feb 2025, 12:48 am
बेळगाव : अधिकारी वर्गातील बेबनावमुळे गेल्या काही दिवसांपासून महापालिका कार्यालय चर्चेत असतानाच आता कार्यालय दलालांचा अड्डा बनत चालल्याचे स्पष्ट झाले आहे. कन्नड संघटनांचे म्होरके महापालिकेत तळ ठोकून असून अनेक प्रकरणांत सेटलमेंट करण्यात येत आहेत. यातून अनेकदा वादावादी आणि शिवीगाळीचे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे सामान्य जनता आणि प्रामाणिक अधिकार्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
महापालिका आरोग्य विभागातील दोन वरिष्ठ अधिकार्यांत काही दिवसापासून वाद सुरू आहे. त्यातून चक्क महापालिका आयुक्तांसमोरच हमरीतुमरी झाली होती. त्यामुळे हे कार्यालय चर्चेत असताना आता विविध प्रकरणांचे सेटलमेंट कार्यालयात बसून होत आहे. त्यामध्ये कन्नड संघटनांचे म्होरके सक्रिय असून सेटलमेंट करतानाही त्यांच्यामध्ये वादावादी होत आहे. शुक्रवारी (दि. 7) दुपारी गँगवाडी परिसरातील माजी नगरसेविकेचा पती आणि दुसरा एक म्होरक्या यांच्यात जोरात वादावादी झाली. एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. त्यामुळे कार्यालयात एकच गर्दी झाली होती. या प्रकरणात कन्नड संघटनेचा मोरक्या सेटलमेंट करत होता. दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना शिव्या देत होते. हा प्रकार पाहून कार्यालयात आलेल्या लोकांनी नाराजी व्यक्त केली. तर अनेक अधिकार्यांनी या मोर्चामुळे आमच्या कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांना आवरण्याची गरज आहे, असे सांगितले.
एकीकडे लोकांना आपली कामे करून घेण्यासाठी वारंवार महापालिकेच्या चकरा माराव्या लागतात. साधा जन्म-मृत्यू दाखलाही एका भेटीत मिळत नाही. अशा ठिकाणी आता राजकीय वरदहस्तामुळे सेटलमेंट बहाद्दरांचे फावले आहे. नेहमी मराठी भाषिकांना टार्गेट करणार्या कन्नड संघटनाच्या म्होरक्याने तर महापालिकेतच तळ ठोकला आहे. जमिनीची प्रकरणे तो हाताळत आहे. याकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
मराठी सत्ता गेल्यापासून...
महापालिकेत मराठी भाषिकांची सत्ता गेल्यापासून कन्नड संघटनांच्या कथित नेत्यांची वर्दळ वाढली आहे. अधिकार्यांना ब्लॅकमेल करणे, त्यांच्यावर दबाव घालणे, बेकायदा कामे करून देण्यास भाग पाडणे असे प्रकार होत आहेत. याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाले आहे.