Published on
:
18 Nov 2024, 1:22 am
Updated on
:
18 Nov 2024, 1:22 am
कोल्हापूर : ‘लाडकी बहीण’बाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझे हात मोडण्याची भाषा केली जाते. परंतु, हातच काय, माझा भांग विस्कटणारा अजून जन्माला यायचा आहे. उद्धव ठाकरे यांना इशारा द्यायचा नाही. मात्र, ठाकरे यांच्या वक्तव्याचा गैरअर्थ काढून कोणी भांडवल करू नये यासाठी हे बोलावे लागले, अशा शब्दांत खा. धनंजय महाडिक यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेवेळी महाडिक बोलत होते.
खा. महाडिक म्हणाले, राजघराण्याच्या सुनेचा अर्वाच्य भाषेत अपमान करणार्या बंटी पाटील यांनी माफी मागितली का? महाविकास आघाडीतील मंत्र्याने उद्योगपतीच्या घराजवळ बॉम्ब लावण्याचे काम करून पोलिस संरक्षणासाठी पैसे मागितले. महायुतीने कोल्हापूरला विमानतळ, रेल्वे स्टेशन, महामार्ग अशी विविध कामे सुरू केली. 1500 रुपये देताना तिजोरीत खडखडाट होतो. तीन हजार रुपये देताना खडखडाट होणार नाही का?
खा. महाडिक म्हणाले, बंटी पाटलांसारखे वागलो तर जिल्ह्यात कुठलाही पक्ष शिल्लक राहणार नाही, असे विश्वजित कदम म्हणतात. याचा अर्थ बंटी पाटील खूनशी आहेत. राजकारण कसे करतात. जिल्हा अविकसित राहण्यास बंटी पाटील जबाबदार आहेत. 15 वर्षे महापालिकेत सत्ता, चार आमदार होते. तरीही त्यांनी काम केले नाही. प्रकल्प आणले नाहीत. टोल पावती फाडली. टोलचे समर्थन करून सूर्याजी पिसाळ आहोत हे त्यांनी सिद्ध केले. अडीच वर्षांत थेट पाईपलाईन झाली नाही तर निवडणूक लढविणार नाही, अशी 14 वर्षांपूर्वी शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी तीन निवडणूक लढविल्या. एकटेच अभ्यंगस्नान करून आले. केंद्र सरकारच्या महायुतीच्या योजनांचे श्रेय घेण्याचे काम केले.
खा. धैर्यशील माने म्हणाले, योगी आदित्यनाथ सभेला जातात तेथील निकाल त्याचदिवशी लागतो. लोकसभेला मी निवडून येतो की नाही, अशी चर्चा असताना योगी आदित्यनाथ यांच्या एका सभेने इचलकरंजीतून 40 हजारांचे मताधिक्य मिळाले.
काँग्रेस नेत्यांचा दहशतवाद संपुष्टात येईल : नरके
गेल्या पाच वर्षांतील महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या कारभाराची तुलना करा. महायुतीने पायाभूत योजना गतिमान केल्या, असे सांगून माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सतेज पाटील यांच्यावर टीकेची झोड उठविली. नरके म्हणाले, जिल्ह्यात मी म्हणेल ती पूर्व दिशा, मी म्हणेल ते सर्वकाही होणार हा दहशतवाद संपुष्टात येणार, काँग्रेस नेत्यांचा दहशतवाद संपुष्टात येऊन नेस्तनाबूत होईल.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम म्हणाले, जाहीरनाम्यात महिलांना पैसे देण्याची भाषा करणार्या काँग्रेसला अडीच वर्षात महिला दिसल्या नाहीत का? काँग्रेस व मविआडीकडून दिशाभूल करून आमिष दाखविले जात आहे. .
राजकारणातून संन्यास घेणार का? ः क्षीरसागर
शंभर कोटी रुपयांच्या रस्ते कामाची वर्कऑर्डर झाली नसेल तर मी राजकारणातून संन्यास घेईन, झाली असेल तर विरोधक संन्यास घेणार का? असा सवाल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बंटी पाटील यांना नाव न घेता केला. मनपा रोजंदारी कर्मचार्यांच्या शासन आदेशाबाबतही संभ—म निर्माण केला जात आहे, असेही क्षीरसागर म्हणाले. कोल्हापूर दक्षिणमध्ये खुंटलेला विकास आणि झालेला अन्याय दूर करण्यासाठी महायुतीला विजयी करा, असे आवाहन अमल महाडिक यांनी केले.
आरक्षण बळकावण्याचा प्रयत्न
शरद पवार आणि काँग्रेसने मागासवर्गीयांच्या मतदारसंघात इतर उमेदवार देऊन आरक्षण बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी केला. भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, संतोष ऊर्फ बाळ महाराज यांची भाषणे झाली. कार्यक्रमास आ. जयश्री जाधव, महायुतीचे उमेदवार अशोकराव माने, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, शौमिका महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजवर्धन निंबाळकर, नाथाजी पाटील, भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रुपाराणी निकम, गायत्री राऊत यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अमल बोलत नाहीत अन् शौमिका थांबत नाहीत
आपली राजधानी अबाधित राहण्यासाठी छत्रपती ताराराणी लढत राहिली. झाशी नहीं दूँगी म्हणून झाशीची राणी लढत राहिली, त्याप्रमाणेच ‘दक्षिण’ देणार नाही म्हणत शौमिका महाडिक लढत आहे, असे सांगून खा. माने यांनी अमल महाडिक बोलत नाहीत अन् शौमिका थांबत नाहीत, असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.