Published on
:
01 Feb 2025, 12:42 am
Updated on
:
01 Feb 2025, 12:42 am
ओरोस : राज्याची सागरी सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असून मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांचे सागरी सुरक्षेला नेहमी प्राधान्य राहिले आहे. राज्यातील सागरी क्षेत्रात मासेमारीसाठी जाणार्या नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेच्या मागील (वरच्या) भागात दोन्ही बाजूंनी स्पष्टपणे दिसेल तसेच नौकेच्या केबिनच्या छतावर कोरून रंगविणे बंधनकारक आहे. तसेच मासेमारी नौकेवरील प्रत्येक खलाशाने स्मार्ट कार्ड/आधार कार्ड जवळ बाळगणे बंधनकारक असल्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे यांनी निर्गमित केले आहेत.
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच ससून डॉकला भेट दिली होती. त्यावेळी बहुसंख्य खलाशांकडे आधार कार्ड नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती. त्यावेळी मासेमारीसाठी जाणार्या खलाशांकडे आधार कार्ड असणे आवश्यक असल्याचे आदेश काढण्याच्या सूचना मंत्री राणे यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक खलाशाने आधार कार्ड जवळ बाळगणे आवश्यक आहे. वरील कार्यवाही सर्व मच्छिमार सहकारी संस्थांनी तत्काळ करणे आवश्यक असल्याचेही या आदेशात म्हटले आहे.
आदेशाची परिपूर्तता झाल्याशिवाय कोणत्याही नौकेचे मासेमारी परवान्यांचे नूतनीकरण व मासेमारी टोकन निर्गमित करू नये, अशा नौका ज्या नोंदणी क्रमांक व कलर कोड ठळकपणे प्रदर्शित करीत नाहीत व नौकेवरील खलांशाकडे टठ उेवशव आधार कार्ड अथवा स्मार्ट कार्ड आढळून येत नाही, अशा नौका मालकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 (सुधारित 2021) अंतर्गत मासेमारी परवाना अटी-शर्तींचा भंग म्हणून मासेमारी परवाना रद्द करण्याबाबत कार्यवाही करावी, असेही आदेशात म्हटले आहे.